UPSC Exam : 'IAS-IPS' बनण्याचा 'डंकी' रूट, झोल करून 'अधिकारी' होण्याचे 7 मार्ग!
- Published by:Shreyas
Last Updated:
अनेकवेळा यूपीएसी परीक्षा देणाऱ्या पूजा खेडकर यांना अचानक दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं आणि त्याच्या आधाराने त्या आयएएस झाल्या, त्यामुळे देशभर वाद उभा राहिला. कायद्यातल्या आणि व्यवस्थेतल्या पळवाटांमधून पदं मिळणाऱ्यांचा हा डाँकी मार्ग तुम्हाला थक्क करणारा, चक्रावून टाकणारा आणि मती गुंग करणारा आहे.
विलास बडे, प्रतिनिधी
मुंबई : अनेकवेळा यूपीएसी परीक्षा देणाऱ्या पूजा खेडकर यांना अचानक दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं आणि त्याच्या आधाराने त्या आयएएस झाल्या, त्यामुळे देशभर वाद उभा राहिला. त्या वादानं देशातील सर्वात अवघड अशी अग्नीपरीक्षा मानल्या जाणाऱ्या यूपीएसीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या प्रकरणामुळे यूपीएससीतून पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवारांकडून शोधल्या जाणाऱ्या पळवाटांची चर्चा सुरु झाली आहे. कायद्यातल्या आणि व्यवस्थेतल्या पळवाटांमधून पदं मिळणाऱ्यांचा हा डाँकी मार्ग तुम्हाला थक्क करणारा, चक्रावून टाकणारा आणि मती गुंग करणारा आहे.
advertisement
स्वत:च्या देशातून कोणत्याही कागदपत्रांच्या शिवाय बेकायदेशीरपणे बाहेर पडून दुसऱ्या देशात प्रवेश करण्याच्या मार्गाला डॉंकी रुट असं म्हटलं जातं. नुकताच शाहरुखचा डंकी सिनेमा आला होता. तो त्यावरच होता.
देशातली सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अक्षरश: रक्त आटवतात, पण यातले काही गॅम्बलर कायद्यातल्या पळवाटा शोधून त्याच्याआधारे पोस्ट मिळवण्यासाठी रक्त आटवतात. त्यांच्या पळवाटांच्या त्या मार्गालाही यूपीएससीचा डाँकी रुटच म्हणावं लागेल.
advertisement
हे डाँकी रुट कुठले आहेत हे जाणून घेण्याआधी आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीतलं कटऑफ समजून घ्यावं लागेल. कारण या कटऑफच्या भोवतीच हा सगळा खेळ सुरु असतो. कटऑफ गाठण्यासाठीच डाँकी रुट निवडला जातो.
2023 च्या UPSC च्या निकालानुसार
जनरल कटऑफ - 953
EWS कटऑफ - 923
OBC कटऑफ - 919
SC कटऑफ - 890
advertisement
ST कटऑफ - 891
PwBD 1 - 894
PwBD 2 - 930
PwBD 3 - 756
PwBD 4 - 589
वेगवेगळ्या आरक्षणाचा लाभ घेवून कमी मार्कांचं कटऑफ गाठण्यासाठीच डाँकी रुट निवडला जातो. आता जाणून घेवूया यूपीएससीतले हे डाँकी रुट कुठले आहेत?
जातप्रमाणपत्राचा जुगाड
जनरल प्रवर्गासाठी सहा अटेम्ट देण्याची मुभा आहे. हे अटेम्ट संपले की ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्याचा जुगाड केला जातो. त्यातून आणखी तीन अटेम्ट मिळतात. ओबीसी प्रमाणपत्र असलेला उमेदवार दिव्यांग प्रमाणपत्र काढतो. कारण त्याला अटेम्टची मर्यादा नाही तर वयाची अट आहे. त्यामुळे अटेम्ट वाढवण्यासाठी प्रमाणपत्रांचा आधार घेतला जातो.
advertisement
नॉन क्रिमिलेअरचा जुगाड
एखादा उमेदवार ओबीसी आहे पण वडिलांच्या मोठ्या उत्पनामुळे तो क्रिमिलेअरमध्ये येत असेल त्याला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. मग नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आईवडिलांचा कागदोपत्री घटस्फोट घडवला जातो. जर आई आणि वडील दोघेही क्लासवन असतील तर आई वडिलांनी बेदखल केल्याचं प्रमाणपत्र काढलं जातं. अशा प्रकारे ओबीसी नॉनक्रिमिलेअरचं प्रमाणपत्र काढलं जातं. ईडब्लूएसच्या प्रमाणपत्रसाठीही अशाच प्रकारे जुगाड केला जातो.
advertisement
EWS प्रमाणपत्राचा जुगाड
कमी आर्थिक उत्पन असलेल्यांना केंद्र सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं. त्याच्या प्रमाणपत्रासाठी आर्थिक उत्पन्न आणि प्रॉपर्टीची मर्यादा आहे. त्यामुळे जास्त उत्पन्न आणि मोठी प्रॉपर्टी असलेले उमेदवार प्रॉपर्टी तात्पुरती नातेवाईकांच्या नावावर करतात. सलग तीन वर्षाचं कमी उत्पन्न दाखवतात आणि EWS चं प्रमाणपत्र मिळवतात किंवा संपत्तीतून बेदखल आहोत असं दाखवलं जातं.
advertisement
केडरसाठी कागदोपत्री लग्नाचा जुगाड
होम केडर मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येकाला ते मिळत नाही. पण त्यात पती पत्नीसाठी दोघेही आएसएस, आयपीएस किंवा आएफएस असतील तर केडर बदलण्याची सोय आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी काहीजण कागदोपत्री लग्न करतात. तीन वर्ष ते लग्न टिकलं तर केडर कायम राहातं. तसं ते डील केलं जातं. होम केडर मिळवण्यासाठी आधी रहिवाशी दाखला दुसऱ्या राज्यातला काढला जातो. त्यानंतर आऊटसायडर म्हणून होमकेडर मिळवण्याचाही डाँकी मार्ग निवडला जातो.
दिव्यांग प्रमाणपत्राचा मार्ग
दिव्यांगांना विशेष असं आरक्षण दिलं गेलं आहे. ते आरक्षण लाटण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र काढली जातात. त्यात असे आजार दाखवले जातात ज्यात दृष्य स्वरुपात दिव्यांगत्व दिसणार नाही आणि सहज डिटेक्ट होणार नाहीत. उदाहणादाखल सांगायचं तर मानसिक आजार हा त्यापैकीच एक आहे.
रायटरचा दुरुपयोग
दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून रायटर निवडला जातो. तो रायटर यूपीएससी परीक्षा दिलेला असतो. रायटरनं आधी परीक्षा दिली आहे हे लपवलं जातं. अशा प्रकारे रायटरच्या मदतीनेही यूपीएससी पास होण्याचा डाँकी मार्ग निवडला जातो.
फक्त मुलाखतीपर्यंत जाण्याचा मार्ग
उमेदवार ओपन किंवा ओबीसीतला असेल आणि त्याला फक्त मुलाखतीपर्यंत जायचं असेल तर हा मार्ग वापरला जातो. ओपन किंवा ओबीसीतला कँन्डीडेट सर्टिफिकेट नसतानाही एससी किंवा एसटी प्रवर्गातून किंवा पीएच अर्थात दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करतो. कारण त्याच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी ही नंतर होते. त्याच्यामुळे त्याला आरक्षणाच्या कमी मार्काच्या आधारे मुलाखतीपर्यंत पोहोचता येतं. त्याला पोस्ट नको असते. फक्त आपण यूपीएससीच्या मुलाखतीपर्यंत जावून आलो हे सांगायचं असतं किंवा काहीजण कोचिंग क्लासेस जाँईन करण्यासाठी मुलाखतीपर्यंत गेल्याचा फायदा करुन घेतात.
दरवर्षी जवळपास 10 लाख विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देतात त्यातले साधारण हजारभर पोस्ट मिळवण्यात यशस्वी होतात. यूपीएससीला आयुष्याचं धेय्य मानून सर्वस्व पणाला लावणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मार्गानं पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे गँम्बलरही इथं कमी नाहीत. यात अनेकजण यशस्वीही होतात. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची संधी मारतात. त्यामुळे कायदे, नियम, अटी आणि व्यवस्थेतल्या पळवाटा शोधून डाँकी मार्गानं घुसखोरी करणार्यांना रोखणं व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे. प्रश्न यूपीएससीच्या विश्वासार्हतेचाही आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2024 11:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
UPSC Exam : 'IAS-IPS' बनण्याचा 'डंकी' रूट, झोल करून 'अधिकारी' होण्याचे 7 मार्ग!