विधवा महिलेवर दु:खाचा डोंगर, घर जळून खाक, कर्जातून मिळालेल्या 50 हजाराच्या नोटाही जळाल्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कडाक्याच्या थंडीत विधवा महिलेच्या घराला अचानक आग लागून त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. कडाक्याच्या थंडीत विधवा महिलेच्या घराला अचानक आग लागून त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. घराला आग लागल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शोभाबाई दिलीप अहिरे (वय- ५५) यांच्यावर आभाळ कोसळलं आहे. आगीमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
बचत गटाच्या कर्जाचे ५० हजार रुपयेही नष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, चावलखेडे येथील शोभाबाई दिलीप अहिरे या गेल्या ३० ते ४० वर्षांपासून माहेरीच राहून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्या लाकूड आणि पाचटांनी बांधलेल्या झोपडीत राहत होत्या. रविवारी (७ डिसेंबर) या झोपडीला अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
advertisement
या अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य, धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शोभाबाईंना नुकतंच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळालं होतं. या कर्जातील पन्नास हजार रुपये त्यांनी आपल्या घरात ठेवले होते. पण आगीमुळे या सगळ्या नोटा जळाल्या आहेत.
या दुर्घटनेत शोभाबाई यांचं डोक्यावरील छत नष्ट झालं आहे. कडाक्याच्या थंडीत निवाऱ्याचे साधन गमावल्यामुळे त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या विधवा महिलेला या गंभीर संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने आणि सामाजिक संस्थांनी तातडीने आर्थिक मदत व निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 08, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विधवा महिलेवर दु:खाचा डोंगर, घर जळून खाक, कर्जातून मिळालेल्या 50 हजाराच्या नोटाही जळाल्या


