मंत्रिपद काय चाटायचं आहे का? गणेश नाईक पुन्हा संतापले, एकनाथ शिंदेंना म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. महापालिका निवडणुकीनंतरही नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील हल्ले सुरूच ठेवले आहेत.
नवी मुंबई : मंत्रिपद गप्प बसण्यासाठी नाही. जनतेच्या बाजूने बोलण्यासाठी आहे. मंत्रिपद काय चाटायचे आहे का? असा संतप्त सवाल गणेश नाईक यांनी केला. यावेळी त्यांचा रोख थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. महापालिका निवडणुकीनंतर उभय नेत्यांमधला संघर्ष संपेल, असे वाटत होते. मात्र आता त्यांच्या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळेल, असे दिसते.
नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी रुग्णालये, उद्याने, सार्वजनिक वापरासाठीभूखंड देण्याची मागणी आपण सातत्याने करत आलो आहे. मात्र, मोकळे भूखंड नवी मुंबईकरांसाठी वापरात आणायचे सोडून बिल्डरांच्या घशात घालत आहेत. दलालांमार्फत हे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला.
भूखंडांच्या प्रश्नावर गणेश नाईक शिंदेंना भिडले
मी ज्या मंत्रिमंडळाचा भाग आहे, त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने अशा प्रकारचे कृत्य केले, याची मला लाज वाटते, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेटपणे लक्ष्य केले. माझा राग शांत करायचा असेल, तर नवी मुंबईचे सर्व भूखंड परत करा. हे भूखंड जनतेचे आहेत, ते जनतेलाच मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी आणि सिडको प्रशासनालाही त्यांनी जाहीर सुनावलं आहे.
advertisement
आपण मंत्री असलो तरी पक्षशिस्तीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पक्षाने मंत्रिपद दिले म्हणून मी गप्प बसणार नाही. जनतेसाठी बोलू शकलो नाही, जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही, तर मंत्री होण्याचा काय उपयोग? असा थेट सवाल नाईकांनी उपस्थित केला. नवी मुंबईतील भूखंडांच्या प्रश्नावर गणेश नाईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिकेत असून, निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमधला संघर्ष सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
advertisement
गणेश नाईक vs एकनाथ शिंदे यांच्यात कमालीचा संघर्ष
गणेश नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ठाणे जिल्ह्यात काम करण्याचा त्यांना गेली ३० ते ३५ वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना वाढीची जबाबदारी भाजपने गणेश नाईक यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा जोर कमी होईल, अशी व्यूह रचना आखून गणेश नाईक सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेत आहेत. मग जनता दरबार असो वा जाहीर सभांमधून उघडपणे इशारा देणे असो... दोन्ही नेत्यांमधला संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 10:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्रिपद काय चाटायचं आहे का? गणेश नाईक पुन्हा संतापले, एकनाथ शिंदेंना म्हणाले...









