सिगारेट पिताना वाद, तरुणांनी डोक्यात दगड घालून व्यावसायिकाचा घेतला जीव, जळगावातील धक्कादायक घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या लाँड्री व्यावसायिकाच्या मृतदेहाच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या लाँड्री व्यावसायिकाच्या मृतदेहाच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक क्रूर खून असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. केवळ सिगारेट पिताना झालेल्या किरकोळ वादातून आणि शिवीगाळीच्या रागातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
अमर सपकाळे असं हत्या झालेल्या लाँड्री व्यावसायिकाचं नाव आहे. त्यांचा मृतदेह खंडेराव नगर परिसरातील रेल्वे रुळाजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
अल्पवयीन आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
advertisement
तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री संशयित दोन आरोपी रेल्वे रुळाजवळ सिगारेट पीत बसले होते. त्याच वेळी अमर सपकाळे तिथे आले. ते दारूच्या नशेत होते. नशेत असलेल्या सपकाळे यांनी आरोपींना काही कारणावरून शिवीगाळ केली. याच रागातून आरोपींनी सपकाळे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केली.
advertisement
दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले असले तरी, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. रामानंदनगर पोलीस पथक या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 9:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिगारेट पिताना वाद, तरुणांनी डोक्यात दगड घालून व्यावसायिकाचा घेतला जीव, जळगावातील धक्कादायक घटना!







