डिव्हायडर तोडून कंटेनरमध्ये घुसली इनोव्हा, 22 वर्षीय झोयाचा मृत्यू, जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगाव-भुसावळ महामार्गावर इनोव्हा कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात झोया पठाणचा मृत्यू, अरबान खान गंभीर जखमी. परिसरात शोककळा पसरली.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: गाणी ऐकत गप्पा मारत महामार्गावरुन जात असताना अचानक असं काही घडलं की कारने थेट स्पीड घेतला, डिव्हायडर सोडून ती पलिकडच्या लेनमध्ये गेली आणि समोरुन येणाऱ्या कंटेनरवर धडकली. कंटेनरने कारला चिरडलं आणि काही अंतर पुढे फरफटत नेलं. हा अपघात इतका भयंकर होता की इनोव्हा गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून भुसावळच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार वेगाने जात होती. कारमध्ये झोया नदिन पठाण (वय २२) आणि अरबान खान (वय २६) हे दोघे प्रवास करत होते. प्रवास अगदी आनंदात सुरू होता, पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक महामार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. वेगात असलेल्या या कारने महामार्गावरील डिव्हायडर अक्षरशः तोडला आणि ती थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. त्याच वेळी समोरून एक अवजड कंटेनर येत होता. काळाने जणू तिथेच सापळा रचला होता.
advertisement
कंटेनर आणि इनोव्हाची समोरासमोर इतकी भीषण धडक झाली की, कारचा पुढचा भाग एखाद्या कागदासारखा चुरडला गेला. लोखंडाच्या पत्र्यांमध्ये झोया आणि अरबान दोघेही अडकून पडले होते. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या लोकांनी धावत घटनास्थळ गाठलं. गाडीची अवस्था पाहूनच काळजाचा ठोका चुकत होता.
दुर्दैवाने, या धडकेत झोया पठाण हिचा जागीच प्राण गेला. अवघ्या बावीस वर्षांच्या मुलीचा असा करुण अंत पाहून जळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिचा सोबती अरबान खान हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत सापडला. स्थानिक तरुणांनी मोठ्या शिताफीने त्याला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवलं. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.
advertisement
घटनेनंतर महामार्गावर काही काळ रक्ताचा सडा आणि गाडीचे तुकडे विखुरलेले होते. ज्या घरात आज आनंदाचे वातावरण असायला हवे होते, तिथे आता झोयाचा देह पोहोचणार असल्याने शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली, पण या अपघाताने वेगाच्या मर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 7:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डिव्हायडर तोडून कंटेनरमध्ये घुसली इनोव्हा, 22 वर्षीय झोयाचा मृत्यू, जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात








