Jalgaon: ५० लाखांचा विमा लाटण्यासाठी अपघाताचा बनाव, पोलिसांचं मोठं पाऊल, सह्या 'केस' उलगडणार!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विमा कंपनीचा फॉर्म कोणी भरला यासाठी संशयितांचे हस्ताक्षराचे नमुने पोलीस तपासणार आहेत. बनावट अपघातासाठी वापरलेली थार कारच्या चालकासह मोटरसायकलचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात ५० लाखांचा अपघाती विमा लाटण्यासाठी रचलेल्या बनावट अपघाताच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून आता विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विमा कंपनीत सादर केलेला दावा अर्ज नेमका कोणी भरला याचा शोध घेण्यासाठी अरुणा जाधव, प्रवीण पाटील, प्रेमचंद पाटील आणि मिथुन जाधव यांचे हस्ताक्षर नमुने घेतले जाणार आहेत. तसेच अपघात घडवून आणल्याचे दाखवण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या थार वाहनाचा चालक युवराज चौधरी याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बनावट अपघातासाठी वापरलेली मोटरसायकल शोधणार
advertisement
या प्रकरणात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील पोस्टमार्टम नोंदीचे रजिस्टर जप्त करून त्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप झाला का?, याचाही तपास केला जाणार आहे. बनावट अपघातासाठी वापरलेली मोटरसायकल शोधून तिचे आरटीओ तपशीलही मिळवले जाणार आहेत. याशिवाय मयत राजेंद्र जाधव यांच्या खऱ्या मृत्यूची नोंद, अंत्यसंस्कार कुठे झाले, तसेच त्यांच्या घरातील फोटोवरील २३ फेब्रुवारी २०२४ ही मृत्यूची तारीख आणि नंतर तयार केलेल्या खोट्या फोटोचा स्रोत याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
advertisement
डॉ. मंदार करंबळेकर यांचा पदभार काढण्यात आला
अटकेतील सर्व आरोपींच्या बँक खात्यांची माहिती आणि आयकर कागदपत्रांचीही तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान मेहुनबारे ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर यांचा पदभार काढण्यात आला असून चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्निल सांगळे यांनी म्हटले आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: ५० लाखांचा विमा लाटण्यासाठी अपघाताचा बनाव, पोलिसांचं मोठं पाऊल, सह्या 'केस' उलगडणार!









