Pahalgam Terror Attack : एक दिवसाआधीच घडला असता पहलगाम हल्ला? आदर्शने जवळून पाहिलं दहशतवाद्यांना!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पहलगाम इथे हल्ला झाला त्याच्या आधीच्या दिवशी जालना येथील राऊत कुटुंब पहलगाम इथेच होते. एका संशयिताने राऊत कुटुंबातील सदस्याबरोबर संवाद देखील साधला.
जालना : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश स्तब्ध आहे. सशस्त्र अतिरेक्यांनी तब्बल 26 पर्यटकांना डोक्यात गोळी घालून ठार केल्यानंतर पाकिस्तान विरोधात देशभर रोष पाहायला मिळत आहे. पहलगाम इथे हल्ला झाला त्याच्या आधीच्या दिवशी जालना येथील राऊत कुटुंब पहलगाम इथेच होते. एका संशयिताने राऊत कुटुंबातील सदस्याबरोबर संवाद देखील साधला. परंतु गर्दी कमी असल्याने त्या दिवशी हल्लेखोरांनी हल्ला करणे टाळले आणि आम्ही नशीब बलवत्तर म्हणून बचावलो, अशी भावना राऊत कुटुंबांनी लोकल 18 बोलताना व्यक्त केली.
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू आणि काश्मीरची देशभर ओळख आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जातात. काश्मीरमधील तणावाची परिस्थिती निवळत असल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. अशातच सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर देशभर आक्रोश आहे.
जालन्यातील राऊत कुटुंब देखील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. 21 एप्रिल रोजी संजय राऊत आणि त्यांचा मुलगा आणि पत्नी असे कुटुंबीय पहलगाम येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तर मुलगा आदर्श हा घोडेस्वारी करण्यासाठी आणि काश्मीरमधील वादीया पाहण्यासाठी बाहेर पडला होता. एका मॅगीच्या स्टॉलवरती मॅगी खाण्यासाठी थांबल्यानंतर एका व्यक्तीने आदर्श याच्याबरोबर संवाद सुरू केला.
advertisement
तुम्ही काश्मिरी वाटत नाही, हिंदू आहात का? असा प्रश्न त्या संशयिताने केल्यानंतर आदर्शने मी इथलाच असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ते संशयित लोक एकमेकांशी बोलत असताना आज गर्दी खूप कमी आहे, असं काहीतरी बोलत होते. यावरून त्यांचा 21 एप्रिल लाच हल्ला करण्याचा इरादा होता परंतु पर्यटकांची गर्दी कमी असल्याने त्यांनी ते टाळले, असं आदर्श राऊत यांनी सांगितले. त्याच दिवशी हल्लेखोरांनी हल्ला केला असता तर आम्ही देखील अतिरेक्यांच्या गोळीची शिकार झालो असतो. दैव बलवत्तर म्हणून आम्ही या हल्ल्यातून बचावलो, अशी भावना आदर्श राऊत यांनी व्यक्त केली.
advertisement
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम इथे सुरक्षा व्यवस्थेमध्ये चूक झाल्यानेच 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आम्ही तिथे होतो तेव्हा तिथे कोणतेही सुरक्षारक्षक तैनात नव्हते. किमान पाच, दहा, पंधरा सुरक्षारक्षक किंवा सैनिक तैनात असते तर निष्पाप पर्यटकांचा जीव गेला नसता. सुरक्षा यंत्रणेतील ही मोठी चूक होती. आम्ही देखील या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो, असं संजय राऊत यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, एनआयएने अतिरेक्यांचे स्केच जारी केल्यानंतर आदर्श राऊत यांनी संशयिताला ओळखले असून त्यापैकीच एकाने 21 एप्रिल रोजी आपल्याशी संवाद साधल्याचे आदर्शने सांगितले. आपण एनआयएला मेलद्वारे माहिती दिली असून आवश्यकता वाटल्यास चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी आदर्श राऊत यांनी दर्शवली आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 28, 2025 7:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Pahalgam Terror Attack : एक दिवसाआधीच घडला असता पहलगाम हल्ला? आदर्शने जवळून पाहिलं दहशतवाद्यांना!










