Kay Sangte Dnyanada : ठाकरेंना हवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, काँग्रेसकडे 3 तर पवारांकडे 2 नावं, कुणाला मिळणार पसंती?
- Published by:Shreyas
Last Updated:
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी राजकारण वातावरणात मात्र निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी राजकारण वातावरणात मात्र निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण, महाविकास आघाडीत मात्र निवडणुकीआधीच मुख्यमंत्रिपदासाठी दबावाचं राजकारण रंगल्याचं दिसतंय. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला. पण, हा नारळ फोडतानाच ठाकरेंनी एक विधान केलं, ज्यामुळं काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चेहरेच पडले.
'शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो', असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी अगदी थेटपणे ज्या तऱ्हेनं शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांना सवाल केले, ते पाहता ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही आरसा दाखवतायेत का? हा सवाल आहे. महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांमधून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शोधायचा विचार केला, तर काही प्रमुख नावं समोर येतात. काँग्रेसच्या बाबतीतली ही टॉप थ्री नावं काहीशी अशी असू शकतात.
advertisement
पहिल्या तीनमध्ये सर्वात पहिलं नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेचं येतं, अत्यंत कठीण काळात राज्यातल्या काँग्रेसची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि आता लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वात तळाला असलेल्या पक्षाला नंबर वनचा पक्ष बनवलंय, त्यामुळे काँग्रसकडून ते प्रबळ दावेदार मानले जातात. दुसरं नाव बाळासाहेब थोरातांचं , थोरातांचा मराठा चेहरा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभवही काँग्रेससाठी फायदेशीर ठरतो. तर तिसरं नाव पृथ्वीराज चव्हाणांचं गृहीत धरलं तर त्यांच्याकडे असेलेला मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांची जमेची बाजू मानली जाते.
advertisement
पण, लोकसभेच्या निवडणूकीतही थेट पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणारी काँग्रेस राज्याच्या विधानसभेसाठी ही रिस्क घेईल का? हाच मोठा प्रश्न आहे. जी स्थिती काँग्रेसची, त्याहून अडचणीची स्थिती राष्ट्रवादीत आहे. त्याला कारण म्हणजे वर्षभरापूर्वी पडलेली फूट.
पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडे शरद पवार हेच सर्वात मोठा आश्वासक चेहरा आहेत. दुसरं नाव अर्थात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं आहे. तर तिसरं नाव खासदार सुप्रिया सुळेंचं आहे. पवारांच्या एकमेव कन्या आणि राजकीय वारसदार म्हणून त्यांचंही पारडं जड आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव अधून मधून चर्चेत येत राहतं. पण, लोकसभा निवडणुकीत पवारांनी सर्व सूत्र स्वत:च्याच हाती ठेवत यश मिळवल्यानं, आता विधानसभेतही पवार कुणाचं नाव पुढे करतात? याची उत्सुकता असेल.
advertisement
निवडणूकीआधी राज्यातल्या आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची कधीच घाई केलेली नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर आघाडीतले हे दोन पक्ष कसं रिअॅक्ट करतात ते पाहणं इंटरेस्टिंग असेल. उद्धव ठाकरे नुकतेच दिल्लीत गेले होते. हा दिल्ली दौरा मुख्यमंत्रिपदासाठीच्या लॉबिंगचा एक भाग असल्याची चर्चाही झाली. तर पुढचं सरकार ठाकरे 2.0 असेल असं संजय राऊतांनी जाहीरही करुन टाकलं.
advertisement
ठाकरेंच्या सेनेने वारंवार मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर करण्यासाठी दबाव वाढवला, पण, काँग्रेसने मात्र ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा आग्रह कायम ठेवल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे पवारांसारख्या मुरब्बी नेत्यानंही काँग्रेसच्या सूरात सूर मिसळत, आघाडी हाच चेहरा असल्याचं विधान केलं होतं.
आधी पृथ्वीराज चव्हाण आणि नंतर शरद पवारांनीही 'ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री' या सुत्राला सकारात्मकता दाखवली. पण, शुक्रवारच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मित्रांचं हे सूत्र फेटाळून लावल्याची चर्चा आहे. पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूती असल्याची चर्चा रंगत असते. लोकसभा निवडणूकीत ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी उसळत होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मविआचे प्रचारप्रमुख बनवण्याला काँग्रेस नेत्यांचा होकार आहे. पण, उद्धव ठाकरेंना फक्त प्रचारप्रमुख पद नव्हे तर मुख्यमंत्रीपद हवंय, त्यामुळेच आता अगदी उघडपणे मित्रांना सवाल विचारत, ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर दबाव वाढवल्याचं दिसतंय.
advertisement
महाराष्ट्रात अजून निवडणूकांच्या तारखांचा पत्ता नाही, महाविकास आघाडीचं जागावाटप शिल्लक आहे. कुणी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या, हे देखील अजून फायनल झालं नाही. पण, त्याआधीच महाविकास आघाडीच्या विधानसभेपूर्वीच्या पहिल्याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी आग्रह धरल्याने, त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत
1- मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुतीत मिठाचा खडा टाकेल का?
advertisement
2- विनाचेहरा निवडणूकीला सामोरं जायला ठाकरेंची शिवसेना तयार होईल का?
3- निवडणूकी आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची रिस्क महाविकास आघाडी घेईल का?
4- आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव जाहीर करण्याचे ठरले तर कोण असेल महाविकास आघाडीचा चेहरा?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2024 10:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kay Sangte Dnyanada : ठाकरेंना हवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, काँग्रेसकडे 3 तर पवारांकडे 2 नावं, कुणाला मिळणार पसंती?