Knee Health: ज्येष्ठ नागरिकच नाही तर तरुणही गुडघेदुखीने हैराण, या टिप्स फॉलो केल्यास मिळेल आराम, VIDEO
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Knee Health: गुडघेदुखीचं प्रमाण वाढण्यामागे जीवनशैलीशी निगडीत विविध घटक कारणीभूत आहेत.
बीड: गुडघेदुखी हा त्रास आता फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजकाल तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात गुडघेदुखी वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, वाढलेलं वजन, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे गुडघ्यावरील ताण सातत्याने वाढतो. सुरुवातीला साध्या वेदना जाणवतात. पण, याकडे दुर्लक्ष केल्यास हा त्रास संधिवातात (Arthritis) परिवर्तित होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. गुडघ्याच्या सांध्यातील कूर्चा झिजल्यामुळे हालचाल कठीण होते. पायाना सूज येणे आणि चालताना वेदना होतात.
तज्ज्ञांच्या मते, गुडघेदुखीचं प्रमाण वाढण्यामागे चुकीची बैठकशैली, दीर्घकाळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव तसेच वाढलेलं वजन हे घटक कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरीमुळे तर शहरी भागात बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे गुडघ्यावर येणारा ताण समानच आहे. याशिवाय कॅल्शियम व व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं हाडं कमकुवत होतात.
advertisement
काही घरगुती उपायांच्या मदतीने हा त्रास कमी करता येतो. गरम पाण्याने शेक दिल्याने स्नायूंचा ताण कमी होतो आणि वेदना कमी जाणवतात. हळदीचं दूध, मेथीचे दाणे, आलं व लसूण यांचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीरातील दाह कमी होतो. तिळाच्या किंवा नारळाच्या तेलाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते व वेदनांमध्ये आराम मिळतो. तसेच साधी योगासनं आणि स्ट्रेचिंग केल्याने गुडघे मजबूत होतात.
advertisement
गुडघेदुखी वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर तपासणी करून आवश्यक असल्यास एक्स-रे किंवा एमआरआय करून अचूक निदान करतात. त्यानंतर औषधोपचार, फिजिओथेरपी, किंवा गुडघ्यात दिली जाणारी विशेष इंजेक्शन थेरपी सुचवली जाते. काही रुग्णांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी किंवा ग्लुकोसामिनसारखे सप्लिमेंट्स दिले जातात. मात्र, गुडघा पूर्ण झिजल्यास कृत्रिम गुडघा प्रत्यारोपण (Knee Replacement) हा अंतिम उपाय ठरतो.
advertisement
एकूणच, गुडघेदुखी हा वेदनादायी आजार असला तरी योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि घरगुती उपायांच्या मदतीने त्याची तीव्रता टाळता येऊ शकते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेतल्यास गुडघ्याचं आरोग्य दीर्घकाळ टिकवता येतं.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Sep 03, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Knee Health: ज्येष्ठ नागरिकच नाही तर तरुणही गुडघेदुखीने हैराण, या टिप्स फॉलो केल्यास मिळेल आराम, VIDEO








