Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीने गाठली धोका पातळी! कोल्हापूर - गगनबावडा मार्ग सुरू, कोणते रस्ते बंद?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
कोल्हापूर: गेल्या काही दिवसांत कोल्हापूरसह राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. आता कोल्हापूर शहरासह काही भागात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु, आज, 21 ऑगस्ट रोजी पंचंगंगेने धोका पातळी गाठली. दुपारी 12 वाजता पंचगंगा नदीने 43 फुटांची धोका पातळी ओलांडली असून कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली असून राधानगरीच्या दोन स्वयंचलित दरावाजांतून भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी 43 फुटांवर गेल्यावर धोका पातळी मानली जाते. रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज पावसाने सकाळपासूनच विश्रांती घेतली आहे. कारी ठिकाणी सूर्यदर्शन देखील झाले. मात्र, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरूच आहे. आज दुपारी पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये स्थलांतर प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
कोल्हापूर – गगनबावडा वाहतूक सुरू
कोल्हापूर – गगनबावडा महामार्गावर बुधारी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आज सकाळी या मार्गावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली. तसेच पाणी ओसरल्याने कोल्हापूर गारगोटी मार्ग देखील सुरू झाला आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे.
advertisement
जिल्ह्यातील काही ठिकाणी शाळा बंद
पावसाचा जोर ओसरला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ सुरू आहे. नदीकाठच्या गावांत पुराचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शाळांमध्ये पाणी शिरले असून गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
हे मार्ग अजून बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील 74 बंधारे अद्याप पाण्याखाली असून काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूरमधून कसबा बावडा मार्गे शियेला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर -राजापूर मार्ग अजूनही बंद आहे. तर कोल्हापुरातून राधानगरीकडे येणाऱे मार्ग देखील पाण्यात आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 21, 2025 2:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीने गाठली धोका पातळी! कोल्हापूर - गगनबावडा मार्ग सुरू, कोणते रस्ते बंद?