Ladka Bhau Yojana : शिंदे सरकारने लाडक्या भावांसाठी आणली खास योजना, कोल्हापुरातील तरुणाई काय म्हणाली?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. राज्यभरातील मुलांना विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्य सरकारने राज्यभरातील सर्व मुली आणि महिलांसाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. ही योजना जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच महिलांनी दर महिन्याला 1500 रुपये मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे. पण लाडक्या बहिणींनंतर लाडक्या भावांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याच प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे. एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. राज्यभरातील मुलांना विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या या नव्या योजनेअंतर्गत आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. त्यामध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना दर महिन्याला 6 हजार रुपये, डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना 10 हजार रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत.
जेव्हा एखादा विद्यार्थी वर्षभर एखाद्या उद्योग, कारखाने आणि कंपन्यांच्या ठिकाणी अप्रेन्टिसशिप (अनुभवासाठी विनापगारी काम) करेल. त्यावेळी त्यांना महिन्याला सरकारकडून हे पैसे स्टायपेंड म्हणून मिळणार आहे. अशात त्याला कामाच्या ठिकाणी अनुभवही मिळेल, पुढे अनुभवाच्या जोरावर नोकरीही मिळेल. तर काम करताना आर्थिक मदतही मिळत राहील. त्यामुळे या योजनेबाबत कोल्हापुरातल्या विद्यार्थ्यांनी समाधानाचे बोल व्यक्त केले आहेत.
advertisement
भविष्य घडवण्यासाठी होईल फायदा -
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर कोल्हापुरातील काही तरुणांनी लोकल18 शी बोलताना आपले मत व्यक्त केले. बारावी पास असणाऱ्या पार्थ सुतार या विद्यार्थ्याने सांगितले की, ही योजना नक्कीच फायदेशीर ठरू शकते. 12 वी झाल्यानंतर तो कामाच्या शोधात आहे. अशावेळी बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी किंवा काम करताना पैशांची गरज असते. सध्या ही गरज पूर्ण होऊ शकत नाही आहे. पण या योजनेअंतर्गत नक्कीच काही पैसे मिळू शकतात. ज्यांचा वापर करून अजून चांगले काम मिळवू शकतो, असे तो म्हणाला.
advertisement
अशफाक जमादार या विद्यार्थ्याने डिप्लोमा पूर्ण केला आहे. सध्या एका ठिकाणी तो अनुभवासाठी विनापगारी काम करत आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे साठवता येऊ शकतात. याच वर्षभर साठवलेल्या पैशाचा वापर पुढे व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरीसाठी ही करता येऊ शकतो, असे त्याने सांगितले.
advertisement
मुलींप्रमाणेच मुलांनाही फायदा -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मुलींना आणि महिलांना होणार आहे. दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र, शिक्षणानंतर मुलांना काम करताना या योजनेचा फायदाच होईल. त्यामुळे सरकारने आणलेली ही योजना विद्यार्थ्यांना अगदी उपयुक्त ठरू शकते, असे मत नंदिनी सुतार हिने व्यक्त केले आहे.
advertisement
दरम्यान, सरकारने आणलेल्या या योजनेमुळे स्किल्ड मॅन-पॉवर तयार होण्यास नक्कीच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे पैसे हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर भविष्यात त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल, अशा प्रतिक्रिया समाजातून व्यक्त केल्या जात आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 17, 2024 1:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Ladka Bhau Yojana : शिंदे सरकारने लाडक्या भावांसाठी आणली खास योजना, कोल्हापुरातील तरुणाई काय म्हणाली?