Ganeshotsav 2025: मुंबई-पुणे नाही थेट आबु धाबी, कुलकर्णी कुटुंब 10 दिवसांचा बसवतात गणपती!
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Ganeshotsav 2025: मुळचे पुण्याचे असलेले कुलकर्णी कुटुंब संयुक्त अरब अमिराती देशातील आबू धाबी शहरात स्थायिक झालं आहे.
पुणे : गणेशोत्सव म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर महाराष्ट्रातील गजबजलेले रस्ते, गणपती बाप्पांच्या जयघोषात दंग झालेली मंडळं आणि घराघरातील आनंदाचं दृश्य उभं राहतं. पण, ही परंपरा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आता सातासमुद्रापलीकडेही रुजली आहे. आबू धाबी येथील कुलकर्णी कुटुंबीय हे याचं उत्तम उदाहरण आहेत. गेल्या तीन दशकांपासून ते आबू धाबी येथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत आहेत.
कुलकर्णी कुटुंबीय मूळचे पुण्याचे आहेत. मात्र, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने ते संयुक्त अरब अमिराती देशातील आबू धाबी शहरात स्थायिक झाले आहेत. परदेशात स्थायिक होऊनही ते आपली संस्कृती आणि परंपरा विसरलेले नाहीत. 1996 पासून ते आबु धाबीतील घरी गणपती बसवत आहेत. इतकेच नव्हे तर 2010 पासून त्यांनी गौराईचंही पूजन सुरू केलं. यंदा त्यांचा बाप्पा 30 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे कुलकर्णी कुटुंबासाठी हा उत्सव अधिक खास ठरला आहे.
advertisement
विशेष म्हणजे दरवर्षी त्यांच्या घरी गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठण केलं जातं. या पठणात परिसरातील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी होतात. इतकेच नव्हे तर स्थानिक नागरिकही भारतीय संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी त्यांच्या घरी भेट देतात. पूजा, आरती, मंत्रोच्चार यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. नरेंद्र आणि सुरेखा कुलकर्णी हे दाम्पत्य या उपक्रमाचे मुख्य प्रेरणास्थान आहेत. ते म्हणाले, "आम्ही जेव्हा पहिल्यांदा गणपती बसवला, तेव्हा मनात फक्त एकच इच्छा होती. आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला आपली संस्कृती माहिती व्हावी. आता पाहतो तर हा उत्सव आमच्यासोबत संपूर्ण समुदायाचा झाला आहे."
advertisement
गणेशोत्सवाच्या निमित्त कुलकर्णी कुटुंबीयांच्या घरी विविध उपक्रम राबवले जातात. भजन, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजनही केलं जात. या उत्सवाच्या माध्यमातून ते परदेशातील लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देतात. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात आपली संस्कृती टिकवून ठेवणे, ही मोठी जबाबदारी आहे. कुलकर्णी कुटुंबीयांनी गेली 30 वर्षे हा वारसा जपत आदर्श ठेवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा आता जागतिक पातळीवर झळकत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 02, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganeshotsav 2025: मुंबई-पुणे नाही थेट आबु धाबी, कुलकर्णी कुटुंब 10 दिवसांचा बसवतात गणपती!

