Maratha Reservation : 'छगन भुजबळ मराठा द्वेषी, तर गुणरत्न सदावर्ते...', भाजप नेत्याचा थेट हल्ला
- Published by:Shreyas
Last Updated:
मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर भाजपच्या नेत्यानेही छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव, 15 ऑक्टोबर : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये शनिवारी झालेल्या मराठा मेळाव्यातून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला होता. भुजबळ आणि सदावर्ते यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्यानंतर आता भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
advertisement
'गुणरत्न सदावर्ते चिल्लर माणूस आहे, सदावर्तेंची अक्कल किती चालते हे आम्हाला माहिती आहे, आमचा नाद करू नये,' असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. तसंच फडणवीस आणि सदावर्ते यांची गोळाबेरीज करणं चुकीचं आहे, सदावर्ते स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, विनाकारण त्यांचं नाव फडणवीसांसोबत जोडलं जातंय, असंही नरेंद्र पाटील म्हणाले.
'छगन भुजबळ यांनी कधीच कुठल्या मराठ्याला मदत केली नाही, ते बाजूने नसतात, किंवा समिती गठीत झाली की त्यांना विरोध करतात, दुर्दैवाने या सरकारमध्ये मराठा द्वेषी मंत्री असल्याची खंत वाटते,' असा निशाणाही नरेंद्र पाटील यांनी भुजबळांवर साधला आहे.
advertisement
'मराठा आरक्षण मिळालं नाही तर आमची भावकी काय करयाचं ते ठरवेल. जरांगे पाटील यांच्या आंदोलन आणि भूमिकेला समर्थन देत योग्यवेळी काय करायचं हे दाखवू', असा इशाराच नरेंद्र पाटील यांनी सरकारला दिला आहे. नरेंद्र पाटील यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन देवीला मराठा आरक्षणासाठी साकडं घातलं आहे, सरकारमध्ये असलो तरी आज आम्ही मराठा आहोत, असंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 15, 2023 4:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : 'छगन भुजबळ मराठा द्वेषी, तर गुणरत्न सदावर्ते...', भाजप नेत्याचा थेट हल्ला