MHADA Shops: मुंबईत घर नाही झालं मग आता दुकान घ्या! म्हाडाकडून खास ॲाफर
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
MHADA Shops: मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात दुकानासाठी लागणाऱ्या गाळ्यांचं भाडं देखील खूप आहे.
मुंबई: मुंबईमध्ये अनेक लोक आपला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा भाड्याने घेणं अनेकांना परवडत नाही. कारण, मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात दुकानासाठी लागणाऱ्या गाळ्यांचं भाडं देखील खूप आहे. अशावेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची म्हणजेच म्हाडाची मदत उपयुक्त ठरू शकते. म्हाडाने मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी जाहिरात काढलेली आहे. आता या ई-लिलावाद्वारे होणाऱ्या विक्रीसाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी दुसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या नवीन वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी, अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे या प्रक्रियेसाठी आता 16 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडाच्या या लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे 6 गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे 5, तुंगा पवई येथे 2, कोपरी पवई येथे 23, चारकोप येथे 23, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे 6, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे 6 गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे 9, अँटॉप हिल वडाळा येथे 3, मालवणी मालाड येथे 46 गाळे, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे 17 गाळे व शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी 1 अनिवासी गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे.
advertisement
इच्छुक अर्जदार 16 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज करू शकतात. 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई-लिलाव होणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही वेबसाईटवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
advertisement
लिलावाची सविस्तर माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील 2018 नंतर काढलेले रहिवासी प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 5:01 PM IST