16 वर्षे, 24 महिला, गुंगीचं औषध देत तोडायचा अब्रुचे लचके, मूकबधीर महिलेमुळे मुंबईतला नराधम अटकेत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कुरार पोलिसांनी महेश पवार या सिरीयल रेपिस्टला अटक केली असून, १६ वर्षांपूर्वी मूकबधिर महिलेसह सातपेक्षा जास्त महिलांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
मुंबईच्या कुरार पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलं आहे. १६ वर्षांपूर्वी एका मूकबधिर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ५१ वर्षीय आरोपी महेश पवार याला अटक केली आहे. या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून हे सिरीयल रेपिस्टचं प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. आरोपी महेश पवार विरोधात आतापर्यंत सात महिलांनी समोर येऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
कुरार आणि वाकोला येथील पीडित महिला लैंगिक शोषणाची तक्रार करत असल्याने ही संख्या २४ पेक्षा जास्त असू शकते असा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, ते या महिलांवरील लैंगिक शोषणाचे ठोस पुरावे गोळा करत आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पवार याने १६ वर्षांपूर्वी एका मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. संबंधित महिलेनं अलीकडेच कुरार पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर या सिरीयल रेपिस्टचा भंडाफोड झाला. १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी विरारमधून आरोपीला बेड्या ठोकल्या.
advertisement
आत्महत्येच्या प्रयत्नामुळे घटनेला फुटली वाचा
कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश पवार हा मागील १६ वर्षांपासून पीडित तरुणीवर अनेकदा अत्याचार करत होता. ती मूकबधिर असल्याने आरोपीचा त्रास ती निमूटपणे सहन करत होती. काही दिवसांपूर्वी एका मूकबधिर महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली. यामुळे आरोपीने तिच्यावरही लैंगिक अत्याचार केला असावा, असा संशय या महिलेला आला. त्यानंतर तिने धाडस करून तिच्यासोबत १६ वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती पतीला दिली. यानंतर ठाणे डेफ असोसिएशनचे अध्यक्ष वैभव घैसीस, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद फरहान खान, दुभाषी मधु केनी आणि अली यावर यांच्या मदतीने या जोडप्याने कुरार पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली.
advertisement
एका मैत्रिणीनं पीडितेला आरोपीपर्यंत नेलं
पीडितेनं सांकेतिक भाषेचा वापर करून दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये ती अल्पवयीन होती. त्यावेळी ती एका मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. यावेळी ती मैत्रिणीसह सांताक्रूझ (वाकोला) येथील आरोपीच्या घरी गेली होती. तिथे वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तिला अन्न आणि पेयांमध्ये एक औषध मिसळून देण्यात आलं. काही काळानंतर, मैत्रीण तिथून निघून गेली. याची संधी साधून आरोपीनं बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे व्हिडिओ चित्रित केले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत राहिला. त्यामुळे पीडित महिला १६ वर्षांपासून गप्प होती. आता अखेर हिंमत दाखवून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
16 वर्षे, 24 महिला, गुंगीचं औषध देत तोडायचा अब्रुचे लचके, मूकबधीर महिलेमुळे मुंबईतला नराधम अटकेत









