राग अनावर झाला अन् लाकडी दांड्याने.... रक्ताच्या थारोळ्यात माय-लेकी; दुहेरी हत्येने नागपूर हादरलं
- Reported by:Uday Timande
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हत्येनंतर आरोपीने वापरलेला लाकडी दांडा नदीकाठच्या परिसरात फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहराजवळील गंगापूर परिसरात शिवीगाळाच्या कारणावरून आई आणि मुलीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली असून, दुहेरी हत्येने उमरेड शहर हादरले आहे.
मृत महिलांची नावे पार्वताबाई फुकट (वयोवृद्ध) आणि त्यांची मुलगी संगीता रिठे अशी आहेत. गंगापूर शिवारात नाल्यालगत असलेल्या एका घरामध्ये मायलेकी वास्तव्यास होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पार्वताबाई फुकट यांना विनाकारण शिवीगाळ करण्याची सवय होती. याच शिवीगाळामुळे परिसरातील एका व्यक्तीचा संताप अनावर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लाकडी दांडा नदीकाठच्या परिसरात फेकला
advertisement
आज सकाळच्या सुमारास संशयित व्यक्तीने रागाच्या भरात लाकडी दांड्याने पार्वताबाई फुकट आणि संगीता रिठे या दोघींवर जोरदार हल्ला केला. या मारहाणीत दोघींनाही गंभीर दुखापत झाली. घटनास्थळीच पार्वताबाई फुकट यांचा मृत्यू झाला, तर संगीता रिठे हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. हत्येनंतर आरोपीने वापरलेला लाकडी दांडा नदीकाठच्या परिसरात फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
advertisement
लेकीच्या पतीचे निधन
संगीता रिठे हिचा विवाह शेगाव येथे झाला होता. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर ती आपल्या आईजवळ गंगापूर शिवारात राहण्यासाठी आली होती. मायलेकी अतिशय साधी जीवनशैली जगत होत्या; मात्र या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला.
नेमकं काय घडलं?
घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण, पूर्वीचे वाद आणि आरोपीची भूमिका याबाबत सखोल तपास केला जात आहे.
advertisement
गंगापूर परिसरात भीतीचे वातावरण
दुहेरी हत्येच्या या घटनेमुळे गंगापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पुढील तपास उमरेड पोलीस करत असून, लवकरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राग अनावर झाला अन् लाकडी दांड्याने.... रक्ताच्या थारोळ्यात माय-लेकी; दुहेरी हत्येने नागपूर हादरलं










