नाशिक हादरलं! दहावीचा पेपर देऊन बाहेर पडताच विद्यार्थ्यावर हल्ला, शाळेसमोरच थरार
- Reported by:Laxman Ghatol
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दहावीची परीक्षा सुरू असतानाच अशा प्रकारे केंद्राबाहेर विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याने परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाशिक: नाशिक शहरात पुन्हा गुन्हेगारी जोम धरु लागली असून चक्क शालेय विद्यार्थ्यांवरही हल्ले होऊ लागल्याने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील भद्रकाली परिसरात असलेल्या न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोर बुधवारी दुपारी एका दहावीच्या विद्यार्थ्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. विशेष म्हणजे, हा विद्यार्थी बोर्डाचा पेपर देऊन केंद्राबाहेर आला असतानाच ही घटना घडली.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी दहावीचा पेपर देण्यासाठी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या परीक्षा केंद्रावर आला होता. दुपारी पेपर सुटल्यानंतर तो शाळेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडला. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या 10 ते 15 जणांच्या अज्ञात टोळक्याने त्याला गाठले. काही कळायच्या आतच या टोळक्याने धारदार शस्त्राने विद्यार्थ्यावर हल्ला चढवला.
शालेय परिसरात मोठी घबराट
advertisement
हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की परिसरात असलेल्या इतर विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पळापळ झाली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शालेय परिसरात मोठी घबराट पसरली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू
advertisement
या हल्ल्यामागे जुने भांडण आहे की अन्य काही कारण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयित आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दहावीची परीक्षा सुरू असतानाच अशा प्रकारे केंद्राबाहेर विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याने परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 4:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिक हादरलं! दहावीचा पेपर देऊन बाहेर पडताच विद्यार्थ्यावर हल्ला, शाळेसमोरच थरार









