तुरुंगात तब्येत बिघडली, अजितदादांच्या आमदारावर दु:खाचा डोंगर, पुतण्याचा मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाणे जिल्ह्यातील शाहपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार दौलत दरोडा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाहपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार दौलत दरोडा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पुतणे हरिश दरोडा यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हरिश दरोडा हे एका कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात होते. तुरुंगात असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नेमकं प्रकरण काय?
हरिश दरोडा हे आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी अटकेत होते. या घोटाळ्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी तपास यंत्रणांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले होते आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून ते या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होते.
advertisement
तुरुंगात बिघडली तब्येत
मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात असताना हरिश दरोडा यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची तब्येत अचानक खालावली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तुरुंग प्रशासनाने त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते, परंतु उपचाराला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
आमदार कुटुंबात शोककळा
advertisement
हरिश दरोडा यांच्या मृत्यूची बातमी समजताच शाहपूर परिसरात आणि आमदार दौलत दरोडा यांच्या निवासस्थानी शोककळा पसरली आहे. दरोडा कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हरिश दरोडा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण समोर येईल. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुरुंगात तब्येत बिघडली, अजितदादांच्या आमदारावर दु:खाचा डोंगर, पुतण्याचा मृत्यू








