'पत्नी-मुलीसोबत जगायचं होतं', पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची इमारतीवरून उडी, चिठ्ठीत मन हेलावणारी व्यथा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पिंपरी-चिंचवडमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलीपासून वेगळं राहण्याच्या मानसिक तणावातून जीवन संपवलं आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलीपासून वेगळं राहण्याच्या मानसिक तणावातून केशरी प्रसाद शाहू या तरुणाने भोसरी परिसरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी साडेचारच्या सुमारास भोसरी येथील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत केशरी प्रसाद शाहू याने आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह येत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या व्हिडिओमध्ये तो आपली पत्नी आणि मुलीची आठवण काढताना प्रचंड भावनिक झाल्याचे दिसून आले.
advertisement
तीन पानांची सुसाईड नोट आणि गंभीर आरोप
केशरी प्रसादने आत्महत्येपूर्वी तीन पानांची एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने आपल्या पत्नीला पळवून लावण्यात काही लोकांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. "माझ्या पत्नीला पळवून लावण्यात काही जणांचा सहभाग असून त्यांना तिचे ठिकाण ठाऊक आहे. आमच्यातील वादाचा गैरफायदा घेऊन तिला माझ्यापासून दूर करण्यात आले," असा आरोप त्याने केला आहे.
advertisement
मला माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं. माझं माझ्या मुलीवर अपार प्रेम आहे, असंही त्याने नमूद केलं. त्याने काही व्यक्तींवर सोनं-चांदी बळकावल्याचा आणि धमकावल्याचाही आरोप केला आहे. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्हीची योग्य तपासणी झाली नाही, अशी तक्रारही त्याने चिठ्ठीत केली आहे. त्याने ११ नंबर खोलीत राहणाऱ्या व्यक्तींच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे.
advertisement
भोसरी पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. केशरी प्रसादने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यामध्ये नमूद केलेल्या नावांची आणि आरोपांची चौकशी केली जात आहे. पत्नी आणि मुलीच्या विरहापोटी एका तरुणाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 12:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पत्नी-मुलीसोबत जगायचं होतं', पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची इमारतीवरून उडी, चिठ्ठीत मन हेलावणारी व्यथा









