पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते पदावर अनिश्चितता कायम, नेमका तिढा काय?
- Published by:Ravindra Mane
- Reported by:Tushar Rupanwar
Last Updated:
आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पण विरोधी पक्षनेते पदाची निवड अद्यापही न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महाविकास आघाडी पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे. महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेता निवडण्याइतकी सदस्य संख्या नाही. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येऊनही अद्याप विधीमंडळात विरोधी पक्षनेता अद्याप निवडला नाही. यामुळे आताचं पावसाळी अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडण्याची शक्यता आहे.
आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पण विरोधी पक्षनेते पदाची निवड अद्यापही न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावेळीही विरोधी पक्ष नेत्याविना अधिवेशन चालणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते निवडीचा मुद्दा चर्चेला आला होता. या बैठकीत सत्ताधारी महायुतीने विरोधी पक्षनेते पदासाठी अनुकूलता दर्शवली होती. मात्र, विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधी पक्षांमध्ये अद्याप एकमत झालं नसल्याचा दावा केला जातोय.
advertisement
महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे गटात नेतृत्वाच्या दावेदारांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या नावांवर अजून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळेच निवडीचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन असून, अधिवेशनात त्यावर निर्णय होणार की नाही, हे अस्पष्ट आहे.
खरं तर, विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी विरोधी पक्षनेते पदासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, अद्याप यावर प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, पावसाळी अधिवेशनात सरकारला रोखण्यासाठी विरोधकांची भूमिका किती प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विरोधी पक्षनेते नसल्याने विरोधी बाजूचे एकसंध नेतृत्व अधिवेशनात कमी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेते निवड होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते पदावर अनिश्चितता कायम, नेमका तिढा काय?