अकोला महापालिकेसाठी आंबेडकरांचा जाहीरनामा, शहराच्या पाणी प्रश्नावर मोठी घोषणा, भाजप टार्गेटवर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नागरिकांना जर घाणीत आणि अविकसित शहरात राहायचं असेल, तर त्यांनी भाजपला मतदान करावं, असे आंबेडकर अकोलेकरांना उद्देशून म्हणाले.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला महानगरपालिकेचा जाहीरनामा जाहीर करत शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. अकोलेकरांना घाणीत राहायचे असेल तसेच नऊ दिवसांनी येणारे पाणी त्यांना चालणारे असेल तर त्यांनी खुशाल भाजपला मतदान करावे, असे आंबेडकर म्हणाले.
अकोला महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. शहराचा पाणी प्रश्न मोठा आहे. तसेच इतरही महत्त्वाचे मुलभूत प्रश्न आहेत. भारतीय जनता पक्षाच्या काळात या प्रश्नांचे काय झाले, हे जनता जाणते. त्यामुळे त्यांना बदल हवा असल्यास त्यांनी वंचितला संधी द्यावी, असे आंबेडकर म्हणाले.
advertisement
अकोल्यात एक दिवसाआड पाणी पाहिजे असेल तर...
अकोल्यात ज्यावेळी वंचितचा महापौर होता त्यावेळी एक दिवसाआड पाणी यायचे. आत्ता अकोल्यात एक दिवसाआड पाणी पाहिजे असेल तर, वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. राजकीय पक्षांमध्ये लोकांना देण्याची मानसिकता हवी. आम्हाला लोकांसाठी काम करायचे आहे. सामाजिक परिवर्तनाची लढाई आम्ही लढतो आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
advertisement
शहरातील घाणीचे साम्राज्य, पाण्याची टंचाई, महिलांसाठी इनडोअर स्टेडियम, डम्पिंग ग्राऊंड, लोकांसाठी संध्याकाळी खुली बाजारपेठ, उन्हाळ्यात शहरातील तापमान कमी करण्यासाठीचे प्लॅन, व्यापार आणि युवकांसाठीच्या व्यवसायाच्या संधी यासारख्या अनेक गोष्टी वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेत सत्तेत आल्यावर करेल, अशी आंबेडकरांनी घोषणा केली.
आज अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अकोला शहराचे व्हिजन मांडले.
शहरातील घाणीचे साम्राज्य, पाण्याची टंचाई, महिलांसाठी इनडोअर स्टेडियम, डम्पिंग ग्राऊंड, लोकांसाठी संध्याकाळी खुली बाजारपेठ, उन्हाळ्यात शहरातील तापमान कमी करण्यासाठीचे प्लॅन,… pic.twitter.com/nMCwHpV4Oi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 23, 2025
advertisement
भाजप वगळता सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू
राज्यातील राजकीय समीकरणांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यभरात भाजप वगळता सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू असून सध्या कोणत्याही पक्षाला ठोस डेडलाईन देता येणार नाही.
दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधूंमधील चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपाबाबतही चर्चा पूर्ण झाली असून काही ठिकाणी जागांच्या वाटपावरून त्यांचा वाद असल्याचे संकेत आंबेडकरांनी दिले. या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
काँग्रेसवर जोरदार टीका, मुंबईत २०० जागा लढविण्याची आमची तयारी
काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुंबईत काँग्रेससोबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर सूचक टीका केली. आमची बोलणी जवळपास झाली असल्याचं नेहमी सांगितलं जातं, मात्र जाहीर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, असा चिमटा त्यांनी घेतला. तसेच, आम्ही मुंबईत २०० जागा लढवण्याची पूर्ण तयारी ठेवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही कोणाकडेही गेलो नाही. उलट स्थानिक पातळीवर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना हे पक्ष आमच्याकडे युतीसाठी आले. स्थानिक युतीबाबतचे सर्व अधिकार आम्ही आमच्या जिल्हा कमिटीला दिले आहेत. राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष ५०-५० टक्के उमेदवार उभे करू शकतात. त्यामुळे आमची ताकद स्पष्ट आहे.
view commentsLocation :
Akola,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अकोला महापालिकेसाठी आंबेडकरांचा जाहीरनामा, शहराच्या पाणी प्रश्नावर मोठी घोषणा, भाजप टार्गेटवर









