Private Bus: खासगी बस चालकांचे मनमानी दर, पुणे आरटीओ अॅक्शन मोडमध्ये, कुठे करायची तक्रार?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Private Bus: दसरा आणि दिवाळीच्या काळात हजारो नागरिक सणानिमित्त आपल्या गावी जातात. गावी जाण्यासाठी अनेकदा खासगी बसचा पर्याय वापरावा लागतो.
पुणे: सणासुदीच्या काळात शहरातून गावी जाणाऱ्यांची संख्या फास जास्त असते. एसटी आणि रेल्वेची तिकिटं मिळाली नाही तर अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र, काही खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याचा प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. जास्तीचं भाडे आकारणाऱ्या खासगी बसविरोधात तक्रार करावी, असं आवाहन पुणे आरटीएने केलं आहे. प्रवाशांच्या जागृतीसाठी शहरातील प्रमुख ठिकाणी आणि खासगी बसतळावर माहितीपर फलक लावण्यात आले आहेत. नियमबाह्य पद्धतीने जास्तीचे पैसे घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे.
प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी आरटीओची मोहीम
नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या इतर जिल्ह्यांतील नागरिकांची संख्या जास्त आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात हजारो नागरिक सणानिमित्त आपल्या गावी जातात. त्यामुळे सणांच्या काळात रेल्वे गाड्या व एसटीचं बुकिंग फुल असतं. अशा वेळी गावी जाणाऱ्यांना खासगी बसशिवाय पर्याय राहत नाही. याच संधीचा फायदा घेऊन अनेक खासगी बसचालक दुप्पट तिकीटदर आकारतात. एसटी भाड्याच्या दीडपट दरापेक्षा अधिक भाडं आकारणं बेकायदेशीर आहे.
advertisement
येथे करा तक्रार
जास्तीचे भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी तत्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी 8275330101 हेल्पलाइन क्रमांक आणि buscomplaint.rtopune@gmail.comहा ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तक्रार नोंदवताना प्रवाशांनी आपलं नाव, मोबाइल क्रमांक, प्रवास मार्ग, बस क्रमांक, बसचा प्रकार, बसमधील फोटो आणि तिकिटाची प्रत जोडणं आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले म्हणाले, "सणासुदीच्या काळात खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट होऊ नये, यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. प्रवाशांकडून जादा तिकीट घेतल्यास तक्रार करण्याचं आवाहन आरटीओनं केलं आहे. यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी असलेले फलक शहरातील खासगी बसतळांवर लावण्यात आले आहेत. प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची पडताळणी करून नियमभंग करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली जाईल."
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 05, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Private Bus: खासगी बस चालकांचे मनमानी दर, पुणे आरटीओ अॅक्शन मोडमध्ये, कुठे करायची तक्रार?


