प्रशांत जगतापांनंतर शरद पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमधील बडा नेता भाजपच्या गळाला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
प्रशांत जगताप पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामास्त्र उगारलं आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याला विरोध दर्शवला आहे. प्रशांत जगतापांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. अशात आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
कलाटे हे मागील आठवड्यातच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण त्यांना भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता. ते भाजपात आले तर प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवतील, त्यामुळे याच प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. यात पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगतापांसह शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा समावेश होता. आता अखेर कलाटे यांच्या पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
राहुल कलाटे हे पिंपरी-चिंचवडमधील एक प्रभावी नाव आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते म्हणून त्यांची आजपर्यंतची ओळख राहिलेली आहे. स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क आणि आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग शहरात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०२४ च्या निवडणुकीतील तगडी फाईट
advertisement
नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्याविरुद्ध कडवी झुंज दिली होती. या चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला असला तरी, कलाटे यांनी घेतलेली मते लक्षणीय होती. असा बडा नेता साथ सोडत असल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रशांत जगतापांनंतर शरद पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमधील बडा नेता भाजपच्या गळाला










