Amit Thackeray PM Modi: ''युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष...'', पंतप्रधान मोदींना राजपुत्र अमित ठाकरेंचे पत्र

Last Updated:

Amit Thackeray Letter to PM Modi : 'ऑपरेशन सिंदूर'मधील लष्करी कारवाईबद्दल देशात चालू असलेल्या विजय‑उत्सवांना आवर घालावा, अशी थेट विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

Amit Thackeray  write letter to PM Modi
Amit Thackeray write letter to PM Modi
मुंबई: मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मधील लष्करी कारवाईबद्दल देशात चालू असलेल्या विजय‑उत्सवांना आवर घालावा, अशी थेट विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात सर्वप्रथम ऑपरेशनदरम्यान सैनिकांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेचे कौतुक केले. मात्र युद्धविरामाची स्थिती अस्तित्वात असताना ढोल‑ताशे, तिरंगा यात्रा आणि विजयोत्सव हे अनेकांच्या मनाला वेदना देणारे असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले. अनेक सैनिकांचे बलिदान शौर्यगाथा असूनही आनंद दर्शक आंदोलने विजय यात्रा या समर्पक वाटत नाही. बलिदानाच्या पार्श्वभूमीवर अधिक संवेदनशील राहण्याची गरज असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणं ही जनभावना या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात साक्षरता सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणे अधिक योग्य ठरेल असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींना उद्देशून या पत्रात म्हटले की, आपल्याकडून देशवासीयांना विश्वास आहे.. सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात.. म्हणूनच ही विनंती की, युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशाच्या शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा.. या भावनांची दखल घेतली जाईल ही अपेक्षा असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले.
advertisement

अमित ठाकरे यांंनी पत्रात काय म्हटले?

सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत, याबद्दल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.
advertisement
आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.
या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.
advertisement
या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.
advertisement
त्यासोबतच, सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता, देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये 26 निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल.
advertisement
तसेच, जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा.
मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा.
आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा.
आपला नम्र,
अमित राज ठाकरे
(नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Thackeray PM Modi: ''युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष...'', पंतप्रधान मोदींना राजपुत्र अमित ठाकरेंचे पत्र
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement