Heat Wave Alert: वाऱ्यांची दिशा बदलली, सूर्य आग ओकणार, रत्नागिरी-रायगडमध्ये 24 तास हिटवेवचा अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हिटवेवचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, सांताक्रूझ, हर्णे भागात तापमान आणि आर्द्रता वाढली आहे.
कोकण किनारपट्टीवर आता उन्हाचा तडाखा वाढणार असून निसर्गरम्य रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. वाऱ्यांच्या बदललेल्या दिशेमुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून सूर्याने आता आग ओकायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हिटवेवचा यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यातून आता थंडीने काढता पाय घेतला असून उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे तापमानाचा पाराही सातत्याने वर-खाली होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसत असून, हवामान विभागाने आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या भागात आज अंगाची लाहीलाही करणारा उष्मा आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
राज्यात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबईतील सांताक्रूझ भागात झाली. सांताक्रूझमध्ये तापमान ३५.२ अंशांवर पोहोचले होते, जे सरासरीपेक्षा सुमारे ४ अंशांनी जास्त आहे. कुलाबा येथेही पारा ३३ अंशांवर गेला होता. केवळ उष्णताच नाही, तर हवेतील आर्द्रतेनेही मुंबईकरांना घामाघूम केलं.
रत्नागिरी जिल्ह्यातही रविवारी तापमानाचा पारा ३४.७ अंशांवर होता. विशेषतः हर्णे भागात सकाळी ९७ टक्के इतकी प्रचंड आर्द्रता नोंदवण्यात आली. यामुळे स्थानिकांना प्रचंड उकाडा आणि घामाचा सामना करावा लागला. पुढील ४८ तासांत कोकणातील कमाल तापमानात १ ते २ अंशांची वाढ होऊ शकते. काही भागांत पारा ३७ ते ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
सोमवारी मुंबईत तापमान ३४ अंशांच्या आसपास राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ असू शकते. १७ फेब्रुवारीलाही हेच चित्र कायम राहील. हवेत आर्द्रता वाढल्याने रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची रात्रीची झोपही सध्या उकाड्याने मोडत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवेतील आर्द्रता कमी झाल्यानंतरच किमान तापमानात घट होईल आणि रात्रीचा गारवा पुन्हा जाणवेल. तोपर्यंत मात्र दिवसा उन्हात फिरताना टोपी, चष्मा आणि पाण्याचा वापर वाढवण्याची गरज आहे.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 8:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Heat Wave Alert: वाऱ्यांची दिशा बदलली, सूर्य आग ओकणार, रत्नागिरी-रायगडमध्ये 24 तास हिटवेवचा अलर्ट







