'पॅसेंजर म्हणून बसतो आणि नंतर तोच विमान उडवतो', VSR कंपनी बाबत रोहित पवारांचा सर्वात मोठा खुलासा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विमान अपघातात घातपाताचा संशय, पुरावे मॅन्युपलेट, नियमांची पायमल्ली आणि DGCAच्या भोंगळ कारभारावर गंभीर आरोप केले.
अजितदादांचा विमान अपघात हा केवळ विमान अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत चालल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर इतका मोठा नेता उपमुख्यमंत्री यांचं निधन होतं, मात्र अजूनही संपूर्ण रिपोर्ट येत नाही, या सगळ्या गोष्टी पुरावे मॅन्युपलेट केले जात आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय कागदपत्रांमध्ये देखील बदल केले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्हाला सगळे डिजिटल पुरावे देखील दाखवावेत अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मागच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काही माहिती मिळाल्याचा गौप्सस्फोट केला. इतकंच नाही तर कंपनीचा लेखाजोखा, त्यांच्या भोंगळ कारभार आणि तपासात होत असलेला उशीर या सगळ्यावर गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी यापूर्वी VSR कंपनीने कशापद्धतीनं सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला हे देखील सांगितलं आहे.
advertisement
2023 विमान अपघातातील लूपहोल
हवाई प्रवासाला सर्वात सुरक्षित मानलं जातं, पण मुंबईत २०२३ मध्ये झालेल्या एका विमान अपघाताने सुरक्षा यंत्रणांचे वाभाडे काढले आहेत. या अपघाताच्या तपासातून आणि समोर आलेल्या धक्कादायक पुराव्यांमुळे खळबळ उडाली आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून नियम धाब्यावर बसवणाऱ्या 'VSR' कंपनीचा आणि त्यांना अभय देणाऱ्या यंत्रणांचा एक मोठा पर्दाफाश रोहित पवार यांनी केला आहे.
advertisement
त्या वैमानिकाचा दोनदा दारूमुळे परवाना रद्द!
२०२३ मध्ये झालेल्या विमान अपघातात ज्या वैमानिकांची नावे समोर आली, त्यांच्याबद्दलची माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. सुनील कंजर या वैमानिकाला यापूर्वी दोनदा दारू प्यायल्यामुळे विमान उडवण्यापासून रोखण्यात आले होते. इतकेच नाही, तर त्यांचे परवाना (License) दोन वेळा रद्द करण्यात आला होता. ज्या वैमानिकांना त्यांच्या अशा कृत्यांमुळे व्यावसायिक एअरलाईन्समध्ये काम मिळत नाही, त्यांना या कंपनीने कामावर ठेवल्याचा आरोप केला जात आहे. २०२३ च्या अपघातातील पायलटच्या नावावरही BA टेस्टमध्ये 'पॉझिटिव्ह' नोंदी आढळल्या आहेत.
advertisement
पॅसेंजर म्हणून जायचा आणि वैमानिक म्हणून विमान उडवायचा!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे कॅप्टन कॅरिओस या वैमानिकाचे परवाना संपुष्टात आलेले असतानाही त्याला विमानात प्रवासी म्हणून बसवले जायचे.त्यानंतर तो थेट कॉकपिटमध्ये जाऊन विमान उडवायचा. अमेरिकेने ज्याचे लायसन्स रद्द केले आहे, असा व्यक्ती भारतात लोकांचे प्राण धोक्यात घालून विमाने उडवत आहे. विशेषतः उदयपूरमधील एका व्यावसायिकाला उद्देशून या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवार यांनी विनंती केली आहे. जर तुम्ही VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत असाल, तर हा 'पॅसेंजर' पायलट तुमचा जीव धोक्यात टाकू शकतो.
advertisement
नियमांची पायमल्ली आणि DGCA चा भोंगळ कारभार?
समोर आलेल्या पुराव्यांनुसार, VSR कंपनीत नियमांची अक्षरशः ऐशीतैशी केली जात आहे. BA टेस्टमध्ये छेडछाड केली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. वैमानिकांच्या दारू तपासणीच्या मशीनमध्ये तारखा बदलण्याचे प्रकार घडले आहेत. अपघात झालेल्या विमानाची (VT-SSK) इंजिनची लाईफ प्रत्यक्षात संपलेली असतानाही कागदोपत्री ती शिल्लक असल्याचे दाखवून विमान उडवले जात होते. खर्च वाचवण्यासाठी चक्क प्रवाशांना 'कॅबिन क्रू' म्हणून दाखवले जायचे आणि त्यांच्याकडून काम करून घेतले जाई.
advertisement
विमानात असणे अनिवार्य असलेले पायलट लॉग बुक, इंजिन लॉग बुक आणि फ्लाइट प्लॅन देखील अनेकदा उपलब्ध नाहीत. रिपोर्टमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकारात नागरी विमान वाहतूक संचालनालय या कंपनीला 'पायघड्या' घालत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विमानाचे मॉडेल कोणते आहे हे देखील नीट माहिती नसलेल्या यंत्रणा या अपघाताचा काय तपास करणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 11:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पॅसेंजर म्हणून बसतो आणि नंतर तोच विमान उडवतो', VSR कंपनी बाबत रोहित पवारांचा सर्वात मोठा खुलासा









