निवडणुकीआधीच नियतीनं घात केला, नाशकात ठाकरे गटाच्या उमेदवाराचा झोपेतच मृत्यू
- Published by:Ravindra Mane
- Reported by:BABBU SHAIKH
Last Updated:
नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. इथं ठाकरे गटाच्या २४ वर्षीय उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बब्बू शेख, प्रतिनिधी मनमाड: नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक १० 'अ' मधील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार नितीन वाघमारे यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सोमवारी दिवसभर प्रभागात फिरून प्रचार केल्यानंतर ते रात्री घरी येऊन झोपले होते. मात्र झोपेतच नियतीने घात केला आहे. अवघ्या २४ व्या वर्षीच नितीन वाघमारे यांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीआधीच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या २४ वर्षांचे असलेले नितीन वाघमारे हे एक उत्साही आणि तरुण उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. नागरिकांशी भेटीगाठी, पदयात्रा आणि सभांच्या माध्यमातून ते सक्रिय होते.
मात्र, काल रात्री झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या प्रचाराचा अतोनात ताणतणाव त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असावा, अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या कामाच्या गडबडीने या तरुण उमेदवाराचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.
advertisement
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
नितीन वाघमारे यांच्या निधनाचं वृत्त कळताच मनमाड शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानी तातडीने पोहोचले. त्यांनी वाघमारे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि वाघमारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
वॉर्डची निवडणूक पुढे ढकलणार?
निवडणूक जाहीर झाली असताना उमेदवाराचे निधन झाल्यामुळे आता प्रभाग क्रमांक १० 'अ' मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे मनमाडकर नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
view commentsLocation :
Manmad,Nashik,Maharashtra
First Published :
November 25, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीआधीच नियतीनं घात केला, नाशकात ठाकरे गटाच्या उमेदवाराचा झोपेतच मृत्यू


