Solapur Crime : सोलापूरच्या तरुणीची अक्कलकोटमध्ये हत्या! स्वामींच्या दर्शनाला आली अन् प्रेयकराने सांडला रक्ताचा सडा, कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Crime News : रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आई बाहेरून घरी आली. त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती. त्यामुळे आईला प्रश्न पडला. ती अक्कलकोटला गेल्याचं बहिणीने सांगितलं.
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणीची अक्कलकोटमध्ये निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रविवारी सकाळी 10.30 ते 11.45 च्या सुमारास अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील एका घरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, तरुणीवर वार केल्यानंतर संबंधित तरुणाने स्वतःच्या गळ्यावरही धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तो गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
स्नेहाचा गळा चिरून खून
मयत तरुणीची ओळख स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय 20, रा. रामवाडी, सोलापूर) अशी पटली आहे. स्नेहाचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीचे नाव आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) असं आहे. अक्कलकोट येथील पिरजादे प्लॉटमधील एका घरात हे दोघे असताना हा थरार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
advertisement
धारदार हत्याराने स्नेहाच्या गळ्यावर वार
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि आदित्य यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. स्नेहा ही मागासवर्गीय समाजाची असून, याची पूर्ण कल्पना आदित्यला होती. तरीही काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच आदित्यने धारदार हत्याराने स्नेहाच्या गळ्यावर वार करून तिला जागीच ठार केले. या घटनेनंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पोलीस निरीक्षणासाठी उपचार सुरू आहेत.
advertisement
शाळेत शिपाई म्हणून काम
स्नेहाच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, तिच्या वडिलांचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिची आई एका शाळेत शिपाई म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आपल्या तरुण मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला
रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आई बाहेरून घरी आली. त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती. त्यामुळे आईला प्रश्न पडला. आईने दुसरी मुलगी प्रतिक्षाला बहिणीबद्दल विचारलं. तेव्हा स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर आईला चिंता वाटू लागली. त्यानंतर शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याच समजलं. त्यानंतर आई आणि नातेवाईक अक्कलकोटमधील सरकारी दवाखान्यात आले. स्नेहाच्या गळ्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्त्राव झाल्यानं उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
कॉलेजमध्ये असताना झाली ओळख
मुलीच्या आईचे माहेर मैंदर्गी अक्कलकोट येथे आहे. मुलीचे मामा खाजामा पोतेनवरू हे मैंदर्गीत राहतात. तेथे स्नेहा बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मामाकडे होती. मामाकडं असताना आदित्यशी तिची ओळख झाली. तो स्नेहास मोबाइलवरून 'तुझ्यासोबत लग्न करणार आहे,' असे म्हणायचा. 'तू तिच्याशी बोलू नको, परत आमच्या घराकडे फिरकू नको, तुझ्यासोबत आम्ही मुलीचे लग्न लावून देणार नाही,' असं कुटुंबियांनी त्याला सांगितलं होतं. तरीही दोघं संपर्कात होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : सोलापूरच्या तरुणीची अक्कलकोटमध्ये हत्या! स्वामींच्या दर्शनाला आली अन् प्रेयकराने सांडला रक्ताचा सडा, कारण काय?










