आधी रोखठोकपणे फोटो शेअर, टीकेनंतर डिलिट करण्याची वेळ, RSS बैठक हजेरीनंतर सुनेत्रा पवार यांचे अखेर स्पष्टीकरण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sunetra Pawar RSS Meeting: कंगना राणौत यांच्या निवासस्थानी झालेल्या संघाच्या बैठकीला खासदार सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. यावरून प्रचंड टीका सुरू झाल्यानंतर अखेर सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या बैठकीला हजेरी लावल्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रण असूनही अजित पवार आणि पक्षाचे आमदार संघाच्या बौद्धिकांना जात नाही मग सुनेत्रा पवार बैठकीला कशा गेल्या, असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी एक्स माध्यमावरून पोस्ट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे संघाच्या बैठकीला उपस्थिती लावल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी स्वत: पोस्ट करून दिली होती. मात्र टीकेनंतर त्यांना समाज माध्यमांवरून फोटो हटवावे लागले.
सिने अभिनेत्री, मंडी लोकसभेच्या खासदार, कंगना राणौत यांच्या निवासस्थानी झालेल्या संघाच्या बैठकीला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीला सुनेत्रा पवार यांनी संबोधितही केले. यावेळी भारतमातेच्या फोटोसह संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे फोटो दिसत आहेत. राष्ट्रसेविका समितीची ही बैठक होती, असे , सांगितले गेले. ही संघ परिवारातील महिलांसाठी काम करणारी संघटना आहे. संघाशाखेच्या बैठकीला सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
advertisement
सुनेत्रा पवार यांचे अखेर स्पष्टीकरण, म्हणाल्या, मी तिथे गेले कारण...
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
तसेच राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली.
advertisement
कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहिल, असेही सरतेशेवटी सुनेत्रा पवार म्हणाल्या.
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
advertisement
रोहित पवार यांनी सुनेत्रा काकी-अजितदादांवर टीका
बसता उठता अजित पवार शिव शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा जप करतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या पत्नी सुनेत्राकाकी संघाच्या बैठकीला उपस्थिती लावतात, हे दुटप्पी राजकारण असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी रोखठोकपणे फोटो शेअर, टीकेनंतर डिलिट करण्याची वेळ, RSS बैठक हजेरीनंतर सुनेत्रा पवार यांचे अखेर स्पष्टीकरण