'तू दुसरा नवरा केला, मी का नको', म्हणताच आईनं मुलीचा आवळला गळा, संभाजीनगरमधील घटनेचं गूढ उलगडलं!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी इथं संपूर्ण जिल्ह्याला हादवणारी घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी इथं संपूर्ण जिल्ह्याला हादवणारी घटना घडली आहे. प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या वादातून एका आईने स्वतःच्या २१ वर्षीय मुलीचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. नंदिनी राजू धिवरे असं मृत तरुणीचं नाव असून, या प्रकरणी आई भारती उमेश साबळे, सावत्र वडील उमेश सावळे आणि मामा अमोल गायकवाड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मृत नंदिनीचं यापूर्वी लग्न झालं होतं, मात्र पतीपासून विभक्त झाल्यामुळे ती गेल्या तीन वर्षांपासून आईसोबत राहत होती. दरम्यान, तिचे कन्नड येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. आई भारतीचा या लग्नाला कडाडून विरोध होता. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी याच कारणावरून मायलेकीत कडाक्याचे भांडण झालं.
advertisement
भांडणादरम्यान नंदिनीने आईला विचारलं, "तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केलं तर दुसरं लग्न करायला काय हरकत आहे?" हा प्रश्न भारतीच्या जिव्हारी लागला आणि रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले.
बाथरूममध्येच केला खून
घटनेच्या वेळी नंदिनी बाथरूम अंघोळ करत होती. याचवेळी आईने बाथरुमशेजारी असलेल्या हंड्यातून पाणी घेण्याचा बहाणा केला आणि तिथेच पडलेल्या रबरी पाईपने नंदिनीचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर भारतीने स्वतःच मृतदेह बाहेर ओढत आणला आणि तिला कपडे घातले. त्यानंतर पती उमेश आणि भाऊ अमोल यांना बोलावून घेतलं.
advertisement
पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा 'फिल्मी' कट
कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपींनी मृतदेह गादीत गुंडाळला. आपण घर बदलत आहोत, असं भासवण्यासाठी त्यांनी रिक्षात संसारोपयोगी भांडी आणि ड्रम भरले. मृतदेह कन्नड येथील शेतात नेऊन गुपचूप पुरून टाकण्याचा त्यांचा कट होता. मात्र, त्यांचं बिंग फुटलं.
रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे गुपित उघड
रात्री नऊच्या सुमारास रिक्षाने प्रवास करत असताना तिसगाव चौफुली परिसरात आल्यानंतर रिक्षाचालकाला संशय आला. दाम्पत्याकडे असलेल्या गादीत काहीतरी संशयास्पद आहे, असा संशय त्याला आला. त्यामुळे त्याने दाम्पत्याला तिसगाव चौफुली परिसरात रिक्षातून खाली उतरवलं आणि तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.
advertisement
पोस्टमॉर्टेममधून खुनाचा उलगडा
सुरुवातीला आरोपींनी नंदिनीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आईने आपला गुन्हा कबूल केला. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 8:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तू दुसरा नवरा केला, मी का नको', म्हणताच आईनं मुलीचा आवळला गळा, संभाजीनगरमधील घटनेचं गूढ उलगडलं!






