Virar News : शाळेची सुट्टी ठरली काळ; खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्देवी शेवट; परिसर सुन्न
Last Updated:
Virar Accident News : विरारच्या एका परिसरात राम मंदिर तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मात्र ही घटना कशी घडली ते ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आले आहे.
विरार : दोन दिवसांपूर्वी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या दिमाखात पार पडला. या निमित्ताने सर्व शाळांना सुट्टी देण्यातही आली होती. पण ही देण्यात आलेली सुट्टी एका कुटुंबियांसाठी आयुष्यभरासाठी एक चटका देऊन गेली.
''आई, मी येतो गं खेळून..."
विरारच्या बोलिंज परिसरात तलावात बुडून 13 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अर्णव विनायक पाटील असे मृत मुलाचे नाव आहे. अर्णव आपल्या कुटुंबासोबत बोळिंज खारोडी येथे राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीनिमित्त शाळेला सुटी असल्याने अर्णव आपल्या मित्रांसोबत जवळील राम मंदिर तलावाजवळ खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता तो तलावातील एका तराफ्यावर बसला आणि तसाच तो काही वेळानंतर तो पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि अंदाज न आल्यामुळे तो अचानक बुडाला याच वेळी अर्णवला पाण्यात बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवळपास तीन ते चार तास शोधमोहीम राबवून अखेर अर्णवचा शोध लागला. त्याला तातडीने विरार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 8:31 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Virar News : शाळेची सुट्टी ठरली काळ; खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्देवी शेवट; परिसर सुन्न








