महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम परिसरात राहायचंय? पाहा कशी आहे सोय?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
महात्मा गांधी यांच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याचं नियोजन करत असाल तर राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. पाहा सेवाग्राम यात्री निवासाबाबत अधिक माहिती..
वर्धा, 12 ऑगस्ट: महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने वर्धा जिल्ह्याची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात. खरंतर आश्रमाला भेट देण्यासाठी येताना राहण्याची सोय कुठे होईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. तुम्हीही येथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येणार असाल तरी ही बातमी आपल्यासाठीच आहे. सेवाग्राम आश्रमाच्या अगदी समोर हिरवळीने नटलेला यात्री निवास आहे. येथे तुमची राहण्याची उत्तम व्यवस्था होऊ शकते, असे यात्री निवासचे व्यवस्थापक नामदेवराव ढोले यांनी सांगितले.
कमी खर्चात राहण्याची सोय
सेवाग्राम आश्रमात 43 वर्षांपूर्वी यात्री निवास बांधले. तेव्हा कमी लोकांसाठी राहण्याची सोय होती. पर्यटकांचा ओढा वाढत गेल्याने ही संख्या वाढवण्यात आली असून सध्या 188 लोक राहू शकतात. यात 2 बेडच्या रुमसाठी 560 रुपये, 3 बेडच्या रुमसाठी 840 रुपये, टू बेड व्हीआयपी सूट 1680 रुपये असे दर आहेत. सर्वसामान्यांना येथे राहण्याची सोय स्वस्तात आहे. 8, 16 बेडचे हॉल असून प्रति व्यक्ती 168 रुपयांत राहण्याची व्यवस्था होते. या ठिकाणी 8-10 दिवस राहता येते. तसेच या ठिकाणी महात्मा गांधी यांचे स्वच्छतेचे नियम पाळावे लागतात, असे व्यवस्थापक ढोले सांगतात.
advertisement
पारंपरिक जेवणाची सोय
या यात्री निवासाच्या ठिकाणी काही हॉल देखील आहेत. ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या मीटिंग सेमिनार आयोजित होत असतात. त्या ठिकाणी असलेल्या भोजनालयामध्ये सात्विक शाकाहारी आणि पारंपारिक असे जेवण मिळते. यात्री निवासात राहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना शेजारीच सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान संचालित आहार केंद्र देखील आहे. त्याठिकाणी ते नाश्ता आणि जेवणाचा पारंपरिक आस्वाद घेऊ शकतात.
advertisement
यात्री निवासात गांधींच्या विचारांचे दर्शन
भारतीय आणि विदेशी पर्यटक देखील यात्री निवासात अनेकदा मुक्कामी असतात. येथे विश्राम करत असताना पर्यटकांना गांधींच्या आणि विनोबाजींच्या विचारांचे दर्शन होत असते. यात्री निवासातील खोल्यांच्या बाहेर महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या भेटीचे प्रसंग दर्शविणारे अनेक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. हे चित्रही पर्यटक आवर्जून बघतात आणि यात्री निवासात शांततेचा अनुभव घेतात.
advertisement
हिरवळ वेधते लक्ष
हा यात्री निवास तुम्हाला गांधीजींच्या साध्या राहणी आणि उच्च विचारसरणीच्या जीवनाचा वेध देतो. याठिकाणी आकर्षक फुलांची झाडे आणि हिरवाळीमुळे मन अधिकच रमते. पावसाळ्याचे दिवस असले की या परिसरामध्ये हिरवळ अधिकच फुलते आणि निरनिराळी सुगंधी फुलं देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांना यात्री निवास हा अगदी सोयीचा ठरतोय.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
August 12, 2023 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम परिसरात राहायचंय? पाहा कशी आहे सोय?