दोन शेतकरी भावांचा कमाल, एकत्र केलं काम, महिन्याला सव्वा लाखांची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन करतात. धाराशिवमधील शेतकरी बंधू याच व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत.
धाराशिव, 9 नोव्हेंबर: शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वापार पशुपालन आणि कुक्कुटपालन केले जाते. परंतु, सध्या काही शेतकरी शेतीपुरक व्यवसाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून याकडे वळत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बंधू याच व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. वाशी तालुक्यातील नांदगाव येथील रवींद्र पांडुरंग घुले आणि कुमार पांडुरंग घुले या दोघा भावांनी दुधापासून खवा बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय. यातून त्यांना महिन्याकाठी सव्वा लाख रुपयांचे उत्पादन होतेय. तर कुक्कुटपालन त्यांच्यासाठी शाश्वात उत्पन्नाचा मार्ग ठरलाय.
घुले बंधूंचा खवा व्यवसाय
घुले बंधूंनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन सुरू केले. सुरुवातील काही गाई घेतल्या. हळूहळू त्यांची संख्या वाढवत नेली. गाईंच्या दुधापासून खवा निर्मिती करून ते विकू लागले. या खवा व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यातून त्यांना खर्च वजा जाता दररोज 4 हजार रुपयांचा नफा होतोय. तर महिन्याकाठी 1 लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळत असल्याचे कुमार घुले याने सांगितले.
advertisement
कुक्कुटपालन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग
घुले बंधूंनी खवा व्यवसायासोबतच कुक्कुटपालन सुरू केले. त्यांच्याकडे 300 कोंबड्या आहेत. या कोंबड्यांची अंडी ते विकतात. सध्या बाजारात अंड्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे या कोंबड्यांच्या अंड्यांपासून दररोज दोन हजार रुपयांचे उत्पन्न मिळतेय. दूध व्यवसायाला कुकूटपालनाची साथ दिल्याने घुले बंधूंना चांगला नफा मिळत असल्याचे कुमार घुले सांगतात.
advertisement
दरम्यान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन फायदेशीर ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा व्यवसाय केल्यास शेतकरी चांगला नफा कमवू शकतो, असेही घुले बंधू सांगतात.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 09, 2023 12:26 PM IST