MBA तरुणाने नोकरी सोडून केली शेती, सेंद्रीय पेरू विक्रीतून लखपती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
एमबीए झालेल्या प्रफुल्ल लाठी याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून सेंद्रीय शेती सुरू केली.
जालना, 25 नोव्हेंबर: आपल्या देशातील बहुतांश लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. अनेक आव्हानं असताना देखील शेतकरी वर्षानुवर्ष शेती करत आला आहे. पारंपारिक पिके घेऊन जास्त नफा हाती येत नसल्याने अनेक शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. एमबीए झालेल्या प्रफुल्ल लाठी याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून सेंद्रीय शेती सुरू केली आणि आता ते लाखोंची कमाई करत आहेत.
शेतीत सुरू केले प्रयोग
भोकरदन तालुक्यातील हसनाबादचे रहिवासी असलेल्या मनोज लाठी हे आधी ठेकेदार होते. काही दिवस त्यांनी वीट भट्टीचा व्यवसाय देखील केला. आणखी देखील काही व्यवसाय करून पाहिले. मात्र त्यात हवे ते यश त्यांना मिळाले नाही. मग 2017 पासून त्यांनी आपल्या 16 एकर वडिलोपार्जित जमिनीत वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
मुलाच्या सल्ल्याने पेरूची लागवड
मनोज लाठी यांचा मुलगा प्रफुल्ल याने वडिलांसोबत सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. युट्युबवर पाहून मुलाच्या सल्ल्याने त्यांनी छत्तीसगढ येथील रायपूर येथून 1 हजार पेरू रोपे खरेदी केली. या रोपांची त्यांनी 8 बाय 12 अंतरावर आपल्या शेतात लागवड केली. लागवडी नंतर पहिल्या वर्ष बऱ्यापैकी उत्पन्न झाले. मात्र मागील दोन तीन वर्ष त्यांची पेरू बाग तोट्यात होती. दरम्यानच्या काळात त्यांनी यात अनेक वेगवेगळी पिके घेऊन झालेलं नुकसान भरून काढले.
advertisement
व्यवस्थित नियोजनातून लाखोंची कमाई
यंदा लाठी यांनी पेरू बागेचे व्यवस्थित नियोजन केले. शेणखत आणि गांडूळ खताची मात्रा दिली. गाईचं शेण आणि मुत्र यापासून तयार केलेली स्लरी झाडांना दिली. त्यामुळे यंदा पेरूचे 20 ते 25 टन उत्पन्न त्यांच्या हाती येणार आहे. आम्ही पेरू फळे लहान असतानाच त्यांना आवरण बसविले. यामुळे फळाला रोग कीडचा प्रादुर्भाव झाला नाही, असे लाठी यांनी सांगितले.
advertisement
जालन्याचा पेरू सुरतला
यंदा आम्ही थेट ग्राहकांपर्यंत स्पर्श विरहित माल पोहचवत आहे. 23 क्विंटलची एक गाडी सुरतला पाठवली असून तिला 48 रुपये प्रतिकीलो एवढं दर मिळाला आहे. यंदा यातून आम्हाला 10 लाख रुपये उत्पन्न होईल, अशी अपेक्षा असल्याचे मनोज लाठी यांनी सांगितले.
advertisement
नोकरी सोडून सुरू केली शेती
माझं एमबीए मार्केटिंग झालं आहे. 50 हजार रुपये पगाराची नोकरी देखील मला होती. नोकरी सोडून मी शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय. तसेच वडिलांना मदत देखील करतोय. नोकरीमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. शेतीमध्ये जास्त रस असल्याने नोकरी सोडून मी शेती मध्ये आणखी काय करता येईल यावर काम करत असल्याचं मनोज लाठी यांचा मोठा मुलगा प्रफुल्ल लाठी याने सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 25, 2023 7:56 PM IST