यंदा खरीप हंगाम करणार कमाल, शेतकरी होणार मालामाल; कोणत्या पिकांना होणार फायदा?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला राहणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम चांगला होईल व विविध कडधान्य पिकाच्या उत्पादनातं वाढ होईल, असा अंदाज आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होऊन त्यासाठी पोषक असं वातावरण तयार होत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये कडधान्य पेरणीची लगबग सुरु होतेय. कृषीविभागाने सांगितल्या प्रमाणे राज्यात 10 ते 11 जून रोजी मान्सूनला सुरुवात होईल. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला राहणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम चांगला होईल व विविध कडधान्य पिकाच्या उत्पादनातं वाढ होईल, असा अंदाज आहे. यंदाच्या खरीपात कोणत्या पिकांना फायदा होईल? याबाबत पुणे येथील कृषी सहसंचालक विनायकुमार आवटे यांनी माहिती दिलीय.
advertisement
सर्वसाधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. तर 10 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात पोहोचतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस 100 टक्के पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा आहे. राज्यात खरीप हंगाम हा सर्वात मोठा मानला जातो. एकूण 1 कोटी 43 लाख हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाखाली असते. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी आदी पिकं घेतली जातात.
advertisement
खरीप हंगामात कडधान्य पिकेही घेतली जातात. यामध्ये सोयाबीन नंतर सर्वाधिक लागवड तुरीची होते. 11 ते 13 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होत असते. तर उडीद आणि मुगा खालील क्षेत्र जवळपास 8 लाख हेक्टर वर आहे. यामध्ये सातत्याने घट होत आहे. कारण पूर्वी पाऊस हा 7 जूनपर्यंत दाखल होत होता. परंतु आता पाऊस उशिरा येत आहे. मागील वर्षी 23 जूनला पावसाचे आगमन झाले होते. मृग नक्षत्रात जर पाऊस पडून पेरणी झाली नाही तर पिकाच्या उत्पादनातं मोठ्या प्रमाणात घट होते, असे आवटे यांनी सांगितले.
advertisement
यंदा खरीप हंगाम फायद्याचा
यंदा साधारण 10 ते 11 जूनला मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे मूग आणि उडदाचं पारंपरिक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. त्यामध्ये कुठलीही घट होणार नाही. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यंदाचा हंगाम तेल बियांसाठीही चांगला असणार आहे. यामध्ये 38 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी स्वत: बियाणं तयार केलं आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी लाभदायी असणार असल्याचंही कृषी सहसंचालक आवटे सांगतात.
advertisement
सोयाबीनची लागवड करताना घ्या काळजी
सोयाबीन पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी बीबीए तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ होत असते. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची लागवड करताना बीजप्रक्रिया करून करावी. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होतो, अशी माहिती कृषी सहसंचालक विनायकुमार आवटे यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 06, 2024 6:27 PM IST