सोन्याचा दर ऐकून हृदयविकाराचा झटका येईल, चांदीच्या किंमती पाहून डोळे विस्फारतील; सोमवारी शेअर बाजारात होणार भयानक पडझड
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold And Silver: इराण-इजरायल युद्ध तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठांवर दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत उसळी, शेअर बाजारातील घसरण आणि सोने-चांदीत वाढ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई/नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता अधिक भीषण स्वरूप धारण करत आहे. सुरुवातीला इस्रायल-अमेरिकेने मिळून इराणच्या 30 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलसह अमेरिकेच्या 7 लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. कुवैत, यूएई, कतार आणि बहरीन येथील ठिकाणांवर इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.
आता या संघर्षात सात ते आठ देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी झाल्याचे चित्र आहे. इराण मध्यपूर्वेत असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर निशाणा साधत आहे. लेबनॉन आणि हुती गटदेखील इराणच्या बाजूने कारवाया करत असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलवर विविध दिशांनी हल्ले होत असल्याने जागतिक स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संघर्ष किती काळ चालेल आणि किती व्यापक होईल, याबाबत सध्या स्पष्ट अंदाज बांधणे कठीण आहे.
advertisement
दरम्यान शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या युद्धाचा भारतातील विविध क्षेत्रांवर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत तज्ज्ञांकडून विश्लेषण केले जात आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उसळी
या युद्धामुळे भारतासह जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होणे निश्चित आहे, ज्याचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो. भारतासह अनेक देश आपले कच्चे तेल Strait of Hormuz या महत्त्वाच्या जलमार्गातून आयात करतात. युद्ध तीव्र झाल्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
advertisement
शुक्रवारी कच्च्या तेलाचा दर 2.78 टक्क्यांनी वाढून 67.02 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला होता. सोमवारी कमोडिटी मार्केट उघडल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेअर बाजारात घसरणीची भीती
संघर्ष इतका तीव्र झाला आहे की सोमवारी भारतासह जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ही घसरण किती प्रमाणात होईल, हे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर आणि विक्रीच्या दबावावर अवलंबून असेल. शुक्रवारीच याचे संकेत भारतीय बाजारात दिसले होते. इराण-अमेरिका चर्चेला ठोस परिणाम न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण होते. त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स 961 अंकांनी म्हणजेच 1.17 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी 317 अंकांनी म्हणजेच 1.25 टक्क्यांनी खाली येऊन बंद झाला. आता सोमवारी बाजाराची दिशा काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
सोने-चांदीवर काय परिणाम?
जागतिक स्तरावर युद्ध किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. सोने, चांदी आणि कॉपर यांसारख्या ‘सेफ अॅसेट’मध्ये गुंतवणूक वाढते. त्यामुळे या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कमोडिटी मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,61,971 रुपये असून चांदीची किंमत 2,74,389 रुपये इतकी आहे. संघर्ष वाढल्यास या दरांमध्ये आणखी उसळी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 5:02 PM IST
मराठी बातम्या/मनी/
सोन्याचा दर ऐकून हृदयविकाराचा झटका येईल, चांदीच्या किंमती पाहून डोळे विस्फारतील; सोमवारी शेअर बाजारात होणार भयानक पडझड








