का महागली गोरगरिबांची भाकरी? ही आहेत ज्वारीच्या दरवाढीची कारणे, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रोज गरीबाच्या ताटात असणारी ज्वारीची भाकरी आता परवडेनाशी झाली आहे. इथं पाहा का वाढलेत दर?
कोल्हापूर, 11 डिसेंबर: महागाईने सामान्य नागरिकांचे जीवन असह्य करून सोडले आहे. त्यामुळे रोज गरीबाच्या ताटात असणारी भाकरी देखील आता त्याला परवडेनाशी झाली आहे. कारण सध्या ज्वारीचे दर हे अगदी गगनाला भिडले आहेत. त्यामुळेच ग्राहक आता चिंतातूर झाला आहे. मात्र हे दर असेच पुढे अजून काही दिवस राहू शकतील, असेही विक्रेत्यांकडून सांगण्यात येत असल्याने ग्राहकांनी ज्वारी ऐवजी इतर धान्यांकडे आपले लक्ष वळवले आहे.
कोल्हापुरातील शेतीचे क्षेत्र हे ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी ज्वारी पिकालाही तितकीच पसंती देतात. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील एकूण 22 जिल्हे ज्वारी उत्पादनातील प्रमुख जिल्हे आहेत. मात्र तरीदेखील सध्या कोल्हापूरच्या किरकोळ बाजारपेठेत ज्वारीचे दर हे प्रचंड वाढले आहेत. यामध्ये शाळूसह इतर ज्वारीची देखील चढ्या दरानेच विक्री होत आहे.
advertisement
काय आहेत ज्वारी दरवाढीची कारणे?
सध्या ज्वारीचे दर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे मागणी इतका पुरवठा बाजारपेठेत होत नाही. तर ज्वारी उत्पादन क्षेत्राची घट हेच पुरवठा कमी होण्याचे कारण आहे. शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्वारीचे उत्पादनच कमी होत आहे. त्यातच निसर्गाच्या अवकृपेमुळे ज्या जोमाने पेरण्या होण्याची गरज होती त्या तितक्या झालेल्या नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी साठेबाजी देखील झालेली आहे. या सगळ्याचाच परिणाम ज्वारीचा भाव वाढीवर झालेला आहे, असे ज्वारी विक्रेते बबन महाजन यांनी सांगितले.
advertisement
किती वाढलेत दर
किरकोळ बाजारपेठेतील दरवाढीबाबत जर विचार केला, ज्वारी किलोमागे 6 ते 8 रुपयांनी महाग झाली आहे. यामध्ये उच्च प्रतीच्या शाळूबरोबरच त्या खालोखाल सर्व ज्वारीचे दर वाढल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे रोज भाकरी खाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे, असे मत महाजन यांनी व्यक्त केले.
advertisement
काय आहेत सध्याचे दर?
कोल्हापूरच्या किरकोळ बाजारपेठेत सध्या 1 नंबर ज्वारी अर्थात (शाळू) हे 72 ते 80 रुपये प्रति किलो दरात मिळत आहे. तर महिंद्र ज्वारी 52 रुपये, वसंत ज्वारी 40 रुपये प्रति किलो मिळतेय. त्यामुळे सहसा ग्राहकांनी सध्यातरी ज्वारी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
दरम्यान, अजून पुढे किती दिवस हे दर असे राहतील हे सांगणे कठीण आहे. कारण सध्या जरी रब्बीच्या पेरण्या झाल्या असल्या तरी येणारे पीक कितपत हातात येते, यावर भविष्यात ज्वारीचे दर ठरू शकतात. त्यामुळे सध्या तरी ग्राहकांना ज्वारी ऐवजी इतर धान्यांना प्राधान्य द्यावे लागत आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 11, 2023 12:48 PM IST