जेवणावरनं व्हायची नवऱ्यासोबत भांडणं, बायको वैतागली अन् घेतला निर्णय, आता पैसाच पैसा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Business Success: नवऱ्याशी सततच्या भांडणाला कंटाळलेल्या राधिका पोतदार यांनी स्वयंपाकाला चव येण्यासाठी घरगुती मसाले बनवले. आता याच मसाला व्यवसायातून त्या लाखोंची कमाई करत आहेत.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: जेवण चांगलं बनवलं नाही म्हणून नवरा – बायकोची भांडणं झाल्याचे प्रकार आपण ऐकले असतील. पण या भांडणामुळेच एखादा व्यवसाय उभा राहिला, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पंरतु, नाशिकमधील एका गृहिणीबाबत हे खरं ठरलंय. नवऱ्याशी सततच्या भांडणाला कंटाळलेल्या राधिका पोतदार यांनी स्वयंपाकाला चव येण्यासाठी घरगुती मसाले बनवले. त्यामुळं जेवण चांगलं होत गेलं, तसंच याच मसल्याचा व्यवसाय करण्याची कल्पना सूचली. आता ‘सौ. राधिकाज मसाले’ हा मसाल्यांचा ब्रँड झाला असून त्यातून महिन्याला लाखांची कमाई होतेय. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
राधिका पोतदार या मूळच्या नाशिकच्या असून एक गृहिणी आहेत. त्यांनी सुरू केलेला मसाले व्यवसाय आता मोठा झाला असून त्यांच्या ‘सौ. राधिकाज मसाले’ या ब्रँडला मोठी मागणी देखील आहे. याबाबत सांगताना राधिका म्हणात की, “माझ्या पतीला मी बनवलेला स्वयंपाक बऱ्याचदा आवडायचा नाही. त्यामुळे आमच्यात जेवणावरून वाद व्हायचे. सततच्या वादाला कंटाळले होते. त्यामुळे जेवण चांगलं व्हावं, यासाठी घरातच चांगले मसाले बनवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कोरोना काळात घरात बनवले मसाले
कोरोना काळात घरातच खडे मसाले आणून त्यापासून मसाले बनवण्याचा प्रयत्न केला. कोरोना होऊ नये म्हणून तेव्हा काही काढे देखील बनवले. परंतु, तेव्हा बनवलेले मसाले चांगले झाले होते. जेवणात वापरल्यानंतर ते घरातील सर्वांना जेवण आवडायला लागलं. जेवण चांगलं होत होतं त्यामुळे शेजारीही मसाले बनवून घेऊन जात होते, असं राधिका सांगतात.
advertisement
सुरू केला व्यवसाय
घरात बनवलेल्या मसाल्यांची चव सर्वांना आवडत होती. त्यामुळे मसाल्यांचा व्यवसाय करण्याची कल्पना पुढे आली. पतीला देखील ती आवडली. त्यामुळे घरगुती मसाले बनवून विकण्याचा निर्णय घेतला. गेल्या 4 वर्षांपासून विविध प्रकारचे मसाले बनवून विकत आहे. सुरुवातीला फक्त 3 मसाले बनवून त्याची विक्री करत होते. आता 40 पेक्षा अधिक प्रकारच्या मसाल्यांची विक्री करत असल्याचंही राधिका सांगतात.
advertisement
मसाले ब्रँड
सध्या ‘सौ. राधिका मसाले’ हा ब्रँड झाला असून नाशिकच नाही तर राज्यातील इतर भागात देखील मसाल्यांची विक्री होतेय. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील मसाले पाठवत आहे. तसेच कुणी स्वत:चा व्यवसाय करणार असेल तर त्यांना देखील मसाले पोहोच देत असल्याचं राधिका सांगतात. घरगुती भांडणातून सुरू झालेल्या या व्यवसायातून आता महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई होतेय. नाशिकमधील दत्त मंदिर सिग्नल, मोटवणी रोड, गंधर्व नगरी मारुती मंदिराजवळ सौ. राधिका मसाले नावाने दुकान आहे. तसेच इन्स्टा आणि वेबसाईटच्या माध्यमातून देखील मसाल्यांची ऑर्डर स्वीकारली जात असल्याचे राधिका सांगतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
February 21, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/मनी/
जेवणावरनं व्हायची नवऱ्यासोबत भांडणं, बायको वैतागली अन् घेतला निर्णय, आता पैसाच पैसा!