Gold Silver ETF: जगभरात तणाव, शेअर मार्केटवर दबाव, अमेरिका इराण संघर्षात हादरलं ETF, पैसे ठेवायचे की काढायचे? वाचा एक्सपर्टचा सल्ला
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver ETF: रशिया-युक्रेननंतर आता अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक शेअर बाजारावर प्रचंड दबाव दिसत आहे. अशा वातावरणात गुंतवणूकदारांमध्ये घबराट असणे स्वाभाविक आहे.
मुंबई: सध्या जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेननंतर आता अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक शेअर बाजारावर प्रचंड दबाव दिसत आहे. अशा वातावरणात गुंतवणूकदारांमध्ये घबराट असणे स्वाभाविक आहे. मात्र, या सर्व गोंधळात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, 'गोल्ड आणि सिल्वर ETF' (Gold Silver ETF) मध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
सोन्या-चांदीची क्रेझ पुन्हा वाढली
१९ फेब्रुवारी रोजी भारतीय वायदा बाजारात (MCX) सोने आणि चांदीच्या किमतीत चांगलीच वाढ झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोन्याचा भाव (एप्रिल एक्सपायरी) २७२ रुपयांनी वधारून १,५६,०३३ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला होता. दुसरीकडे, चांदीमध्येही ४०० रुपयांची वाढ होऊन ती १,४४,६६८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. १८ फेब्रुवारीला सोन्याच्या दरात २ टक्क्यांची मोठी वाढ झाली होती, जी आजच्या तेजीचा आधार ठरली.
advertisement
ETF मध्ये ४ टक्क्यांपर्यंतची मोठी झेप
शेअर बाजारात थेट सोन्या-चांदीऐवजी 'ETF' (Exchange Traded Funds) मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस नफ्याचा ठरला आहे.
सिल्व्हर ETF:
Groww Silver ETF मध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तसेच UTI, Axis, HDFC, SBI, ICICI Prudential आणि कोटक यांसारख्या जवळपास सर्वच सिल्व्हर ईटीएफमध्ये सकाळी ९:४० च्या सुमारास ४ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली होती.
advertisement
गोल्ड ETF:
सोन्याच्या ईटीएफमध्येही सरासरी २ टक्क्यांची वाढ दिसली. यामध्ये मोतीलाल ओसवाल आणि Groww गोल्ड ईटीएफ आघाडीवर होते. या तेजीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाजार अस्थिर असण्याचं मुख्य कारण काय?
चॉईस ब्रोकिंगचे तज्ज्ञ आमिर माकडा यांच्या मते, किमतीतील या चढ-उतारामागे केवळ युद्ध हेच कारण नाही, तर 'लूनर न्यू इयर' (Lunar New Year) मुळे चीनमधील बाजारपेठा आठवडाभरासाठी बंद आहेत. चीन हा सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. तिथल्या बाजारपेठा बंद असल्याने जागतिक मार्केटमध्ये व्यवहारांचे प्रमाण (Volume) कमी झाले आहे, ज्याला तांत्रिक भाषेत 'लिक्विडिटी व्हॅक्यूम' म्हणतात. यामुळे किमतीत मोठे हेलकावे पाहायला मिळत आहेत.
advertisement
गुंतवणूकदारांनी आता काय करावं?
एलकेपी सिक्युरिटीजचे तज्ज्ञ जतीन त्रिवेदी यांच्या मते, सोन्याचा एकूण कल अजूनही थोडा कमकुवत वाटतोय. सोन्याला पुन्हा वेग पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात ५,००० डॉलरची पातळी पार करणे आवश्यक आहे. सध्या सोन्यासाठी १,४८,००० रुपये हा महत्त्वाचा आधार (Support) असून १,५५,००० रुपये हा अडथळा (Resistance) आहे.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
सध्याची परिस्थिती पाहता, नवख्या गुंतवणूकदारांनी किंवा रोजचे व्यवहार करणाऱ्या ट्रेडर्सनी सोन्या-चांदीच्या व्यवहारांपासून सध्या लांब राहणेच योग्य ठरेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. बाजारातील अनिश्चितता पाहता, घाईघाईत मोठी गुंतवणूक करणे किंवा भीतीपोटी पैसे काढून घेणे या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे निकाल येईपर्यंत बाजारात असेच चढ-उतार राहू शकतात, त्यामुळे 'वाट पाहा आणि सावध राहा' हेच धोरण सध्या फायद्याचे ठरेल, याकडेही एक्सपर्टने लक्ष वेधले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 2:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver ETF: जगभरात तणाव, शेअर मार्केटवर दबाव, अमेरिका इराण संघर्षात हादरलं ETF, पैसे ठेवायचे की काढायचे? वाचा एक्सपर्टचा सल्ला








