Explainer : सेबी म्हणजे काय? 36 वर्षांपूर्वीच्या भूकंपानंतर झाली निर्मिती; असं करतं काम
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी अनेकदा चर्चेत असतं. या वेळी हिंडेनबर्ग अहवालात सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे.
मुंबई : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी अनेकदा चर्चेत असतं. या वेळी हिंडेनबर्ग अहवालात सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे. त्यावरून वाद सुरू झाला आहे. सेबी म्हणजे काय? ही संस्था सुरू करण्याचा उद्देश काय? या संस्थेने ध्येयधोरणांनुसार काम केलं आहे का असे अनेक प्रश्न सामन्यांच्या मनात आहेत. तथापि, सेबीशी संबंधित वाद कमी झालेले नाहीत. व्यापकपणे सांगायचं झालं तर भारतात सिक्युरिटीज आणि कमोडिटी मार्केटचं नियमन करण्याचं काम सेबी करते. यात कंपन्यांचे शेअर्स, भांडवली गुंतवणूक, म्युच्युअल फंड आदींचा समावेश असतो. ही या बाजाराची मुख्य नियामक प्राधिकरण संस्था आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं, रोखेबाजाराचं नियमन करणं आणि विकासाला चालना देण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली.
सेबीची स्थापना कधी झाली?
12 एप्रिल 1988 रोजी भारत सरकारच्या ठरावाद्वारे एका गैर-वैधानिक संस्था म्हणून सेबीची स्थापना करण्यात आली. हा तो काळ होता जेव्हा हर्षद मेहताच्या शेअर घोटाळ्यानंतर देशाचं आर्थिक क्षेत्र हादरलं होतं. शेअर बाजाराबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. त्या वेळी शेअर बाजारातली अनियमितता, शेअर्समध्ये अंतर्गत व्यवहारातून प्रभाव निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. सेबी कायदा 1992च्या अंमलबजावणीनंतर 30 जानेवारी 1992 रोजी सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. या बदलामुळे सेबीला जास्त अधिकार मिळाले आणि स्वतंत्रपणे काम करता आलं. तसंच शेअर बाजार आणि भांडवली गुंतवणूक क्षेत्राचं प्रभावीपणे नियमन करता आलं.
advertisement
सेबीचा उद्देश काय आहे?
भांडवली गुंतवणूक क्षेत्र सुरक्षित आणि पारदर्शक राहील याची खात्री करणं हे सेबीच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक आहे. त्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता आणि भ्रष्टाचार होणार नाही, याकडे लक्ष देणं हे सेबीचं काम आहे. सेबीची मुख्य उद्दिष्टं खालीलप्रमाणं आहेत.
गुंतवणूकदारांचं संरक्षण - गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण सुनिश्चित करणं.
बाजार नियमन - फसव्या पद्धती आणि तशा कार्यपद्धती रोखण्यासाठी स्टॉक एक्स्चेंज आणि म्युच्युअल फंडाच्या कामकाजात योग्य प्रक्रिया अंमलात आणणं.
advertisement
सिक्युरिटीज मार्केटचा विकास - न्याय्य पद्धतींचा प्रचार करणं आणि बाजाराची कार्यक्षमता वाढवणं.
सेबीचं मुख्य काम काय?
सेबीचं काम तीन मुख्य भागात विभागलेले आहे.
- इनसायडर ट्रेडिंग आणि अयोग्य पद्धतींवर बंदी घालणं. इनसायडर ट्रेडिंग आणि किमतीतला फेरफार रोखणं. याबाबतचे आरोप नेहमीच शेअर बाजारावर प्रभाव टाकणाऱ्यांवर केले जातात. त्यामुळे शेअर बाजाराचा फायदा ठरावीक लोकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला आणि अनियमितता झाली.
advertisement
- वाजवी व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देणं.
- गुंतवणूकदारांना आर्थिक शिक्षण देणं.
सेबी नियमनाचं कार्य कसं करते?
- दलाल आणि कंपन्यांसह बाजारातल्या सहभागींसाठी नियम तयार करणं.
- स्टॉक एक्स्चेंजची चौकशी आणि ऑडिट करणं.
- कॉर्पोरेट अधिग्रहण प्रक्रियेचं नियमन करणं.
सेबी आणखी काय काम करते?
- रोखे बाजारातल्या दलालांना प्रशिक्षण देणं.
- इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुलभ करणं आणि बाजारातल्या पायभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं.
advertisement
- सेबीला नियमांचा मसुदा तयार करण्याचा, तपासणी आणि त्याच्या पालनाची चौकशी, अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ती एक अर्ध-विधायिक, अर्ध-न्यायिक आणि अर्ध-कार्यकारी संस्था ठरते. याचाच अर्थ सेबीला शेअर बाजाराशी संबंधित अनेक विशेषाधिकार आहेत.
सेबीची रचना कशी असते?
- सेबी केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालायाच्या प्रशासकीय देखरेखीखाली काम करते. सेबीच्या मंडळात नऊ सदस्य असतात. त्यात केंद्र सरकारने नियुक्त केलेला अध्यक्ष, अर्थ मंत्रालयातले दोन सदस्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक सदस्य यांचा समावेश असतो. तसंच केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले इतर पाच सदस्य असतात. त्यापैकी किमान तीन पूर्ण वेळ सदस्य असतात.
advertisement
सेबीची आचारसंहिता काय आहे?
- सेबी अंडररायटर, ब्रोकर आणि स्टॉक एक्स्चेंजशी संबंधित व्यक्ती अशा आर्थिक मध्यस्थांसाठी आचारसंहिता विकसित करते. ती बाजारातील व्यावसायिक मानकं आणि उत्तरदायित्व राखण्यास मदत करते.
- बाजार विकासाला चालना देणं.
- सेबी सुधारणांना सुरुवात करून, नवीन व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करून, नवीन चांगल्या पद्धतींना प्रोत्साहन देऊन शेअर आणि भांडवली बाजाराच्या विकासाला, वाढीला हातभार लावते.
advertisement
सेबीशी निगडित अलीकडचा वाद कोणता?
ऑगस्ट 2024मध्ये अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती यांचं अदानी समूहाशी संलग्न ऑफशोर संस्थांमध्ये स्टेक होते, असा आरोप केला. या जोडप्याने मॉरिशसच्या आयपीई प्लस फंड1 मध्ये गुंतवणूक केली होती. त्याला अदानाशी संबंधित बर्म्युडा आधारित फंडातून कथितरित्या पैसे मिळाले होते, असा दावा हिंडनबर्गने केला.
यावर आयपीई प्लस फंड 1 हा पूर्णपणे कायदेशीर आणि नियमन केलेला फंड आहे. त्यात बुच यांचा हिस्सा एकूण भांडवलाच्या 1.5 टक्क्यापेक्षा कमी होता, असं सेबीनं स्पष्ट केलं.
मागचे वाद
सेबीने गेल्या काही वर्षांत अनेक वादांना तोंड दिलं. मागच्या काही अध्यक्षांना आरोप आणि वादांना तोंड द्यावं लागलं आहे.
हिंडेनबर्ग अहवाल का जारी करते?
हिंडेनबर्ग रिसर्च ही अमेरिकेतली एक फर्म आहे. ती मोठ्या कंपन्यांमधल्या समस्या उघड करण्यासाठी आर्थिक तपासणीचा वापर करते. ती जनतेने पाहण्यापूर्वी ग्राहकांसाठी अहवाल जारी करते. त्यामुळे ग्राहकांना कंपन्यांच्या शेअर्सवर पैसे लावता येतात. अहवाल सार्वजनिक झाल्यावर जेव्हा स्टॉकच्या किमती कमी होतात, तेव्हा हिंडेनबर्ग आणि त्यांचे क्लायंट दोघंही पैसे कमावतात.
सेबीचे आतापर्यंतचे अध्यक्ष
1. डॉ. एस.ए. दवे 12 एप्रिल 1988 ते 23 ऑगस्ट 1990
2. श्री. जी.व्ही. रामकृ्ष्ण 24 ऑगस्ट 1990 ते 17 जानेवारी 1994 पर्यंत
3. श्री. एस.एस. नाडकर्णी 17 जानेवारी 1994 ते 31 जानेवारी 1995
4. श्री. डी. आर. मेहता 21 फेब्रुवारी 1995 ते 20 फेब्रुवारी 2002 पर्यंत
5. श्री. जी.एन. वाजपेयी 20 फेब्रुवारी 2002 ते 18 फेब्रुवारी 2005 पर्यंत
6. श्री. एम. दामोदरन 18 फेब्रुवारी 2005 ते 18 फेब्रुवारी 2008
7. श्री. सी.बी. भावे 19 फेब्रुवारी 2008 ते 17 फेब्रुवारी 2011
8. श्री. यू. के. सिन्हा 18 फेब्रुवारी 2011 ते 1 मार्च 2017
9. श्री. अजय त्यागी 1 मार्च 2017 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत
10. माधबी पुरी बुच 28 फेब्रुवारी 2022 पासून
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2024 11:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Explainer : सेबी म्हणजे काय? 36 वर्षांपूर्वीच्या भूकंपानंतर झाली निर्मिती; असं करतं काम