ॲड. वर्षाताई देशपांडे यांना UN चा ‘पॉप्युलेशन पुरस्कार’, इंदिरा गांधी आणि जेआरडी टाटानंतर तिसऱ्या भारतीय
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Population Award: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जेआरडी टाटा यांच्यानंतर तिसऱ्या भारतीयाला UN चा प्रतिष्ठेचा ‘पॉप्युलेशन अवॉर्ड’ मिळाला आहे. ॲड. वर्षाताई देशपांडे या मुळच्या साताऱ्यातील आहेत.
मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षाताई देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘पॉप्युलेशन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं आहे. मुलींच्या गर्भहत्या, बालविवाह, आणि बालमजुरी याविरुद्ध त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधी आणि जे. आर. डी. टाटा यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त त्यांना पुरस्कार देण्यात येईल.
ॲड. वर्षाताई देशपांडे या मूळच्या सातारा येथील आहेत. त्या एक प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दलित महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगारासाठी त्या काम करतात. तसेच त्या महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाशी संलग्न असलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राच्या संचालिका म्हणूनही काम पाहातात. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विधिज्ञ समितीत देखील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
advertisement
दरम्यान, अॅड. वर्षा देशपांडे यांचे भाऊ संतोष देशपांडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. “मला तुम्हाला हे कळवताना खूप आनंद आणि अभिमान वाटतो की, भारतातील पीसीपीएनडीटी कायद्याच्या एक क्रूसेडर, माझी मोठी बहीण अॅड. वर्षा देशपांडे यांना 2025 चा प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार मिळाला आहे. इंदिरा गांधी (1983) आणि जेआरडी टाटा (1992) नंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या फक्त तिसऱ्या भारतीय आहेत. मुलींची गर्भहत्या, बालविवाह आणि बालमजुरी यांना रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला,” असं त्यांनी म्हटलंय.
advertisement
कोण आहेत अॅड. वर्षा देशपांडे?
गेल्या 20-25 वर्षांपासून महिलांच्या विविध समस्यांवर अॅड. वर्षा देशपांडे काम करतात. त्यांनी महिलाविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीत मोलाचा वाटा उचलला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची महिलांना माहिती व्हावी आणि त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, या हेतूने त्या साताऱ्यात मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र चालवतात. भोपाळच्या ज्युडिशियल अकादमीत न्यायाधीशांना गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे (पीसीपीडीएनटी) प्रशिक्षण देण्यात देखील त्यांचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या सहकार्याने पीसीपीडीएनटी कायद्याची स्टॅण्डर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर (एसओपी) म्हणजेच आदर्श कार्यप्रणाली या विषयावरील पुस्तक अॅड. देशपांडे यांनी मराठीत लिहिले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2025 8:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ॲड. वर्षाताई देशपांडे यांना UN चा ‘पॉप्युलेशन पुरस्कार’, इंदिरा गांधी आणि जेआरडी टाटानंतर तिसऱ्या भारतीय