स्त्रीबीजाचा वापर कशासाठी केला जातो? बदलापुरात महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केली असून मास्टरमाईंडचा तपास सुरू करण्यात आलाय.
मुंबई : बदलापूरमध्ये महिलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका धक्कादायक रॅकेटचा पर्दाफाश झालाय.गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या स्त्रीबीजांची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केली असून मास्टरमाईंडचा तपास सुरू करण्यात आलाय.
महिलांच्या आरोग्याला घातक असणारं जीवघेणं रॅकेट बदलापूरमध्ये सुरू होतं. या रॅकेटचा भंडाफोड बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना सावंत यांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर झाला. जुवेली परिसरातील नॅनो सिटी इमारतीमधील एका घरात हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय. सुलक्षणा गाडेकर या महिलेने तिच्या घरात मोठ्या प्रमाणात स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स साठवून ठेवली होती. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना डोनर बनवले जात होते.
advertisement
डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी करून इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये पाठवून तिथे त्यांचं स्त्रीबीज काढून विक्री केली जात असल्याचा संशय आहे. छाप्यात मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात आरोपींच्या मोबाईलमध्ये सोनोग्राफीचे फोटो, इंजेक्शनचे फोटो, महिलांची बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती आढळली. या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे या तिघींना अटक करण्यात आली आहे.
advertisement
सुलक्षणा गाडेकर यांना खोट्या आरोपाखाली अडकवल्याचा दावा त्यांच्या पतीने केला आहे. डॉक्टर्स आणि हॉस्पिटलशी समन्वय साधून हे काम सुरू होतं, त्यामुळे त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
स्त्रीबीजाचा वापर कशासाठी केला जातो?
नैसर्गिक गर्भधारणेसाठी स्त्रीबीज महत्त्वाचं असतं. पुरुषाच्या शुक्राणूसोबत स्त्रीबीजाची फलन प्रक्रिया झाल्यानंतर गर्भ तयार होतो. IVF मध्ये स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज काढले जाते. प्रयोगशाळेत शुक्राणूसोबत फलन केले जाते. काही महिलांमध्ये स्वतःची स्त्रीबीज तयार होत नाही. अशा वेळी दुसऱ्या महिलेचे स्त्रीबीज वापरले जाते.
advertisement
तर या संपूर्ण प्रकारामागे आणखी कोण सामील आहे? सोनोग्राफी सेंटर, इंजेक्शन पुरवठादार आणि बनावट कागदपत्र तयार करणारी टोळीचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास आता सुरू करण्यात आलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 10:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
स्त्रीबीजाचा वापर कशासाठी केला जातो? बदलापुरात महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध








