ती शोधून दमली पण सापडला नाही मुलगा, क्लासला गेलेल्या १३ वर्षांच्या मनीषचं थेट पार्थिवच घरी आलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोपरखैरणे सेक्टर २ मधील विद्याभावन सोसायटीत स्लॅब कोसळून मनीषचा मृत्यू झाला. १३ वर्षीय मनीष अभ्यासात हुशार होता. शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी मदत जाहीर केली.
"मनीष... मनीष... कुठे आहेस कुठे शोधू तुला मी आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, हात शोधत होती ते आपल्या मुलाला" कोपरखैरणेच्या त्या अरुंद गल्लीत एका आईचा टाहो ऐकून काळजात चर्रर्र झालं. ज्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडिलांनी गाव सोडून शहराची वाट धरली, तो परत कधीच आई वडिलांना भेटणार नव्हता. कोपरखैरणे सेक्टर २ मधील विद्याभावन सोसायटीत स्लॅब कोसळला आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले.
खासगी क्लाससाठी मनीष गेला होता. तिथल्या वर्गाचा स्लॅब अचानक कोसळला आणि विद्यार्थी त्याखाली दबले गेले. स्लॅब बाजूला केल्यानंतर काही विद्यार्थी बाहेर आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र मनीष सापडत नव्हता. तो स्लॅबच्या सगळ्या खालच्या बाजूला दबला गेला होता. वर्गात मनीष आणि इतर काही मुलं अभ्यास करत बसली होती. अचानक डोक्यावरचा स्लॅब कोसळला. सगळीकडे धुरळा आणि ओरडण्याचा आवाज.
advertisement
आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली, ढिगारा उपसला. इतर काही मुलं सुखरूप बाहेर आली, पण मनीष त्या काँक्रीटच्या वजनाखाली चिरडला गेला होता. त्याला गंभीर अवस्थेत वाशीच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सेंट मेरी शाळेत शिकणारा हा १३ वर्षांचा मुलगा अभ्यासात अतिशय हुशार. वडील दिवसभर रिक्षा चालवून घर चालवायचे, तर आई एका शाळेत काम करून मनीषच्या शिक्षणासाठी खस्ता खायची. चार-पाच वर्षांपूर्वी नेरळजवळील कळमवरा हे आपलं मूळ गाव सोडून हे कुटुंब नवी मुंबईत आलं ते केवळ मनीषला मोठं करण्यासाठी. पण गुरुवारी अचानक त्या वर्गाचा स्लॅब कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
advertisement
मनीषच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. असा कसा सोडून गेलास असं म्हणत आई धाय मोकलून रडत राहिली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी ही अपघाती दुर्घटना असल्याने तूर्तास कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी मृताच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी १ लाखाची मदत जाहीर केली. म्हसे कुटुंबाच्या आयुष्यात मनीषच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही.
advertisement
कोपरखैरणेतील ही घटना पुन्हा एकदा शहरातील जुन्या इमारतींच्या आणि अनधिकृत क्लासच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेली आहे. एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर आता तरी प्रशासन जागे होणार का, अशा इमारतींवर कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 10:24 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ती शोधून दमली पण सापडला नाही मुलगा, क्लासला गेलेल्या १३ वर्षांच्या मनीषचं थेट पार्थिवच घरी आलं










