'लालपरी' सहलीला, विद्यार्थ्यांची धमाल अन् प्रवाशांचे हाल, एसटीच्या निर्णयावर संतापाचं कारण काय?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
मुंबई : दिवाळीनंतर शालेय सहलींचा हंगाम सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या निर्णयाचा परिणाम नियमित प्रवाशांना भोगावा लागत असून राज्यातील अनेक भागांत एसटी बसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय सहलींसाठी एसटी महामंडळामार्फत बसेस देण्यात येत आहेत. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलींसाठी नव्या बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार नव्या कोऱ्या बसेसद्वारे राज्यभरातील हजारो विद्यार्थी गड-किल्ले, समुद्रकिनारे तसेच धार्मिक स्थळांच्या सहलींना जात आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थी या सहलींचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे.
advertisement
दुसरीकडे नियमित प्रवाशांना या व्यवस्थेचा फटका बसत आहे. आधीच अनेक भागांत एसटी बसेसची संख्या अपुरी असताना काही बसेस शालेय सहलींसाठी राखीव ठेवण्यात आल्याने प्रवासी सेवांवर परिणाम झाला आहे. काही मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही बसेस उशिराने येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. “बस वेळेवर न आल्याने कामावर जाण्यास उशीर होतो. काही वेळा तासनतास बसची वाट पाहावी लागते,” अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.
advertisement
दरम्यान, एसटी प्रशासनाकडून मात्र योग्य नियोजन करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. “शालेय सहलींसाठी बसेस देताना नियमित वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे,” असे आगारप्रमुखांनी सांगितले आहे.
तरीही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे शालेय सहलींसाठी स्वतंत्र बसेस किंवा अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्यात यावीत, तसेच नियमित प्रवासी सेवेसाठी एसटी बसची संख्या वाढवावी, अशी ठाम मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 12:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'लालपरी' सहलीला, विद्यार्थ्यांची धमाल अन् प्रवाशांचे हाल, एसटीच्या निर्णयावर संतापाचं कारण काय?









