मोबाईल टॉर्चमध्ये शस्त्रक्रिया, ‘ती’ चूक अन् डॉक्टरांवर 12 वर्षांनी गुन्हा, काय घडलं?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: ऑपरेशनदरम्यान वीज नसतानाही मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आली, जे अत्यंत निष्काळजीपणाचे होते.
मुंबई: पोटच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आईचा दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. आता या संघर्षाला काही प्रमाणात यश मिळाले असून एका डॉक्टरविरोधात तब्बल 12 वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2014 साली घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत गोवंडीतील 23 वर्षीय सलमान बाबर शाह याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आई नसीम बानू बाबर शाह मुलासाठी जिद्दीने लढा देत आहेत.
नेमकं घडलं काय?
8 एप्रिल 2014 रोजी सलमानचा दुचाकी अपघात झाला. या अपघातात त्याच्या उजव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्याला तातडीने गोवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधी दुखापत असल्याने काही दिवसांत तो बरा होईल अशी कुटुंबाची अपेक्षा होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. पुढे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, पण 17 एप्रिल 2014 रोजी ‘सेप्टिसेमिया’मुळे त्याचा मृत्यू झाला. अधिकृत कागदपत्रांमध्ये मृत्यू नैसर्गिक दाखवण्यात आला, मात्र आईला याबाबत संशय होता.
advertisement
नसीम यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशनदरम्यान वीज नसतानाही मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आली, जे अत्यंत निष्काळजीपणाचे होते. योग्य वैद्यकीय सुविधा न वापरता उपचार करण्यात आले. तसेच रुग्णाच्या स्थितीबाबत कुटुंबीयांना चुकीची माहिती देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. उपचारासंबंधी कागदपत्रे वारंवार मागूनही न देण्यात आल्यामुळे ती जाणीवपूर्वक लपवली किंवा नष्ट केली असावीत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
या घटनेनंतर नसीम यांनी न्यायासाठी सातत्याने लढा दिला. त्यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या, माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनेक अडथळ्यांनंतर न्यायालयाच्या निर्देशांनुसार संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर केला.
अखेर पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. “माझा मुलगा परत येणार नाही, पण दुसऱ्या कुणाच्या मुलासोबत असे होऊ नये, म्हणून मी लढतेय,” असे नसीम यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 12:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मोबाईल टॉर्चमध्ये शस्त्रक्रिया, ‘ती’ चूक अन् डॉक्टरांवर 12 वर्षांनी गुन्हा, काय घडलं?






