Nitesh Rane On Sassoon Dock : ससून डॉक होणार हायटेक मासळी बाजार, नितेश राणेंनी रोडमॅपच सांगितला, हजारोंना होणार फायदा
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Tushar Rupnavar
Last Updated:
ससून डॉक संदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ, आमदार सचिन अहिर आणि विविध मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबई: मुंबईच्या ऐतिहासिक ससून डॉकचे आधुनिकीकरण करून त्याचे रूपांतर ‘मॉडेल डॉक’मध्ये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. येथील पारंपरिक मच्छीमार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत अधिक सुरक्षित, स्वच्छ व कार्यक्षम प्रणाली निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. आधुनिक जोड दिल्यामुळे आपल्या मच्छिमारांना देखील मोठा लाभ होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मत्स्यपालन खात्यात आधुनिकता येणे हे खूप गरजेच असल्याचं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं.
ससून डॉक संदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ, आमदार सचिन अहिर आणि विविध मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत स्थानिक मच्छीमार महिलांच्या अडचणी, येथील अस्वच्छता, श्रमिकांच्या सुरक्षेचा अभाव, साधनसंपत्तीची कमतरता, कोल्ड स्टोरेज आणि तंत्रज्ञानविषयक सुविधांचा अभाव यावर सविस्तर चर्चा झाली.
या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ससून डॉक हे केवळ मासळी उतरवण्याचे केंद्र नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. त्यामुळे या परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा, स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, वीजपुरवठा, कोल्ड स्टोरेज, बाजार व्यवस्था आदींची भर घालण्यात येईल.
advertisement
विशेषतः महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने मासळी सोलण्यासाठी विशेष ग्लोव्हज (हस्तमोजे) उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होईल. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून मासळी वर्गीकरण, वजन मोजणी आणि साठवण प्रक्रियेत अचूकता आणि कार्यक्षमता वाढवली जाणार आहे.
हा प्रकल्प केवळ पायाभूत सुधारणा नव्हे, तर मच्छीमार समाजाच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा भाग आहे. या माध्यमातून मुंबईतील मत्स्यव्यवसाय आधुनिकतेकडे वाटचाल करेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दर्जेदार निर्यातीला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 9:40 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Nitesh Rane On Sassoon Dock : ससून डॉक होणार हायटेक मासळी बाजार, नितेश राणेंनी रोडमॅपच सांगितला, हजारोंना होणार फायदा