मुंबईत पहिल्यांदाच असं घडलं, 33 वर्षांच्या तरुणानं 9 वर्षांच्या चिमुकल्यासह एकाचवेळी चौघांना दिलं जीवदान
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ठाण्यातील ३३ वर्षांच्या तरुणाच्या अवयवदानातून ९ जणांना जीवदान, केईएममधील ९ वर्षांच्या मुलासह अनेक रुग्णांना यकृत, हृदय, किडनी प्रत्यारोपणाने नवं आयुष्य
मृत्यूच्या दरात तडफडत असताना अचानक देवदूत यावा आणि चमत्कार घडावा अगदी तसंच झालं. एका व्यक्तीमुळे 9 लोकांना जीवदान मिळालं. त्यात सर्वात मोठा गोष्ट म्हणजे 9 वर्षांच्या मुलाला जीवदान मिळालं. केईएम रुग्णालयात यकृताच्या गंभीर आजाराने मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका ९ वर्षांच्या मुलासाठी ठाण्यातील एक कुटुंब देवदूत ठरलं आहे. रस्ते अपघातात ३३ वर्षांचा तरुण मुलगा गमावल्यानंतरही, त्याच्या कुटुंबाने तरुणाचं अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे केवळ त्या चिमुरड्यालाच नाही, तर इतर चार जणांनाही नवं आयुष्य मिळालं.
एका यकृताने वाचवले दोन जीव!
ठाण्यातील महावीर जैन रुग्णालयात २८ मार्च रोजी हे अवयवदान करण्यात आलं. यकृत स्प्लिट करणं शक्य झालं. याचा एक भाग केईएममधील ९ वर्षांच्या मुलाला देण्यात आला, तर दुसरा भाग नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील एका रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आला. केईएममधील विल्सन डिसीज या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता, ज्यावर यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय होता. नॅशनल रेअर डिसीज फंडातून हा संपूर्ण उपचार विनामूल्य करण्यात आला.
advertisement
४ ग्रीन कॉरिडॉर आणि पोलिसांची तत्परता
अवयव वेळेत पोहोचवण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी भूमिका होती. महावीर जैन रुग्णालयापासून चार वेगवेगळ्या रुग्णालयांपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले होते. तरुणाचं हृदय ठाणे ते गिरगाव (३७ किमी) हे अंतर अवघ्या ३१ मिनिटांत कापून एच.एन. रिलायन्स रुग्णालयात पोहोचवण्यात आले. किडनी आणि स्वादुपिंड नानावटी रुग्णालयात २७ किमी अंतर पार करून ३२ मिनिटांत पोहोचवण्यात आलं. यकृत आणि किडनी केईएम रुग्णालयात २७ किमी अंतर अवघ्या २६ मिनिटांत पोहोचवलं. यकृत अपोलो रुग्णालय नवी मुंबई ३४ मिनिटांत पोहोचवण्यात आलं.
advertisement
४० डॉक्टरांची टीम आणि कुटुंबाचे धैर्य
या संपूर्ण प्रक्रियेत ४० डॉक्टरांचे पथक रात्रंदिवस काम करत होते. महावीर जैन ट्रस्टचे अध्यक्ष अजय आशर यांनी सांगितले की, "तरुण मुलाच्या निधनानंतर कुटुंबाशी अवयवदानावर चर्चा करणे कठीण होते, परंतु त्यांनी दाखवलेल्या धैर्याला आमचा सलाम आहे." या दात्यामुळे हृदय, फुफ्फुस, किडनी आणि स्वादुपिंड यांसारख्या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले असून, हाडे आणि डोळ्यांच्या दानामुळे भविष्यात अनेकांचे जीवन सुसह्य होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 11:50 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत पहिल्यांदाच असं घडलं, 33 वर्षांच्या तरुणानं 9 वर्षांच्या चिमुकल्यासह एकाचवेळी चौघांना दिलं जीवदान








