Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आवाज कुणाचा?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानपरिषद दोन्हीकडे वेगवेगळे निकाल पाहायला मिळाले, एकीकडे जनतेने निर्णय घेतला होता तर एकीकडे लोकप्रतिनिधींनी. परंतु, या निवडणुकांच्या निकालानंतर काही प्रश्न उपस्थित राहतात, त्याचाच आढावा....
मुंबई: राज्यात आज विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले. महायुतीने उमेदवारी दिलेले 9 उमेदवार संख्याबळाच्या जोरावर निवडून आले, तर महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. अशावेळी मतांची जुळवाजुळव आणि फोडाफोडी अगदी साहजिक होती. यामध्ये काँग्रेसची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अशी मिळून 8 ते 10 मतं फुटल्याचं बोललं जात आहे.
मिलिंद नार्वेकर उमेदवार नसते तर... या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य ठरला आहे. नार्वेकर यांचे सर्वपक्षीयांशी असणारे संबंध त्यांच्या पथ्यावर पडले आहेत. पण, जर ठाकरेंनी या जागी दुसरा उमेदवार दिला असता तर त्याचा विजय होण अवघड होतं. तर ठाकरेंनी उमेदवार उभा केला नसता तर शेकापच्या जयंत पाटलांचा विजय निश्चित होता. एकंदरीतच याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये काही चर्चा झाली होती का? की ठाकरेंनी पवारांचा शब्द अंतिम असं न मानता उमेदवार दिला असे प्रश्न निर्माण होत आहे.
advertisement
सांगली निवडणुकीतील प्रचिती: सांगली लोकसभेच्या वेळी देखील ठाकरेंनी राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला अंधारात ठेवत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे बराच कोलाहल महाविकास आघाडीमध्ये माजला होता. सरतेशेवटी ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पराभवाने या संघर्षाची सांगता झाली. यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेचा कोणताही केंद्रबिंदू नाही का? असा सवाल निर्माण झाला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे अशी दुहेरी नेतृत्वाची कमान आणि काँग्रेसची गुलदस्त्यातील भूमिका अशी काहीशी स्थिती महाविकास आघाडीत आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमका आवाज चालतोय कुणाचा? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2024 11:03 PM IST


