Shivrajyabhishek Din 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांचं मुंबईतील पहिलं मंदिर, शिवराज्याभिषेक दिनापूर्वी पाहा Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Shivrajyabhishek Din 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 6 जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रायगडावर जाणं शक्य नसल्यास तुम्ही मुंबईतील शिवरायांच्या मंदिराला भेट देऊ शकता.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ एक ऐतिहासिक दिवस नव्हे, तर तो प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा, प्रेरणेचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. दरवर्षी 6 जूनला रायगडावर हजारो शिवभक्त एकत्र येतात. पण अनेकांना तिथे पोहोचता येत नाही. ज्या मुंबईकरांना रायगडला जाणं शक्य नाही, अशांसाठी एक उत्तम पर्याय आहे. मुंबईतील भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर आहे. इथं शिवराज्याभिषेक दिनी मोठा सोहळा असतो. याच मंदिराबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात माणकोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्यात आलंय. हे भव्य शिवमंदिर शिवप्रेमींमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट उंच आहे. परिसरात साकारलेली 36 शौर्यशिल्पं हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण आहेत.
advertisement
शिवाजी महाराजांची मूर्ती
या मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती अखंड कृष्णशिला पाषाणातून साकारण्यात आली आहे. तिची उंची सहा फूट आहे. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती घडवली आहे. योगीराज यांनी साकारलेली ही पहिलीच भव्य मूर्ती आहे. चार वर्षांपूर्वी या मूर्तीचं काम सुरू झालं होतं. मध्यंतरी रामलल्ला मूर्तीच्या कामामुळे त्यात खंड पडला होता. मात्र नंतर त्यांनी विविध ऐतिहासिक संदर्भ, पोषाख, मुद्रा आणि राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास करून ही मूर्ती पूर्ण केली.
advertisement
मंदिर परिसरात शौर्यशिल्पं
मंदिराच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या जीवनातील 36 महत्त्वपूर्ण प्रसंगांवर आधारित शिल्पचित्रं साकारण्यात आली आहेत. यात अफझलखान वध, आग्र्याहून सुटका, तानाजी मालुसरेंचा सिंहगड लढा आणि राज्याभिषेक यांसारख्या घटना समाविष्ट आहेत. या प्रत्येक प्रसंगाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती दिली आहे, जेणेकरून विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना समजायला सोपे जाईल.
दरम्यान, भिवंडीतील हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सध्या शिवभक्तांसाठी नवे तीर्थस्थळ ठरत आहे. परिसर स्वच्छ, शांत आणि भाविकांसाठी अनुकूल आहे. शिवचरित्राची प्रेरणा घेणाऱ्यांसाठी येथे पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं बरंच काही आहे.
advertisement
कसे जाल?
छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या माणकोली गावातील मांडीत परिसरात आहे. मुंबई शहरापासून सुमारे 1 ते दीड तासांच्या अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत रस्ता मार्गे सहज पोहोचता येते. भिवंडी-कळवा मार्गावरून किंवा मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे माणकोली फाट्यापर्यंत येऊन मंदिर गाठता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 05, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shivrajyabhishek Din 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांचं मुंबईतील पहिलं मंदिर, शिवराज्याभिषेक दिनापूर्वी पाहा Video