Mumbai News: 18Km साठी 3000 भाडं? थायलंड रिटर्न कपलला गंडा घालणं कॅब ड्रायव्हरला महागात पडलं; विमानतळ पोलिसांकडून दोघांना अटक
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबईतल्या दोन कॅब चालकांनी एका थायलंडच्या कपलला 18 किलोमीटरसाठी 400 रूपयांऐवजी 3300 रूपये लाटल्यामुळे कॅब चालकांना सहारा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई: मुंबईतल्या दोन कॅब चालकांनी एका थायलंडच्या कपलला 18 किलोमीटरसाठी 400 रूपयांऐवजी 3300 रूपये लाटल्यामुळे, सध्या सोशल मीडियासह सर्वत्र कमालीचे चर्चेत आहेत. आता त्या दोन कॅब चालकांना सहारा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यांना 400 च्या ऐवजी 3300 रूपये भाडं आकारणं चांगलंच महागात पडलं आहे. त्या दोन्हीही कॅब चालकांना सहारा पोलिसांनी अटक केलेली आहे. यामुळे विमानतळावरून अव्वाच्या सव्वा भाडं आकारणाऱ्या कॅब ड्रायव्हर्सना एक प्रकारे सावधानतेचा इशाराच मिळालेला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन नागरिकाकडून कॅब ड्रायव्हरने 200 डॉलर्स उकाळल्याची घटनाच ताजी होती. ती कमी म्हणून की काय, सहारा विमानतळावरील म्हणजेच, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वरील दोन कॅब ड्रायव्हर्सने थायलंडमधील जोडप्याला गंडा घातला आहे. त्यांना विमानतळावरून वडाळ्याला जाण्यासाठी कॅब बूक केली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वडाळा या प्रवासासाठी जिथे 400 रूपये भाडं लागतं, तिथे त्यांनी त्या कपलकडून 1 हजार थाई बाह्त (भारतीय चलनानुसार 3,300 रुपये) इतकं भाडं घेतलं.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण 8 फेब्रुवारीचं आहे, फिटनेस प्रशिक्षक दर्शन सावंत (29) आणि पत्नी मोनिकासह दुपारी थायलंडवरून भारतात परतले. ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरून वडाळ्याला जाण्यासाठी कॅब पाहत होते. त्यांना वडाळा फायर स्टेशनला जायचे होतं. कॅब पाहत असताना त्या कपलला एका अनोळखी व्यक्तीने त्यांना टॅक्सीची ऑफर दिली आणि 400 रुपये भाडे ठरवले. मात्र, त्याने दोघांना एका टॅक्सीकडे नेले आणि चालक इम्तियाज अहमद (34) याला पुढे जाण्यास सांगितले.
advertisement
त्याचवेळी रियासत अली खान (48) नावाचा दुसरा व्यक्तीही गाडीत बसला. काही अंतरावर गेल्यानंतर खानने चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि तात्काळ 400 रुपयांची मागणी केली. सावंत यांनी भारतीय चलन नसल्याचे सांगत गुगल पेद्वारे पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र खानने रोख रकमेचीच मागणी केली. दाम्पत्याकडे थाई बाह्त असल्याचे कळताच खानने 200 बाह्त देण्यास सांगितले. मोनिकाने पाकीट उघडले असता त्यात 1 हजार 100 बाह्त होते. खानने चातुर्याने संपूर्ण रक्कम हिसकवली. १ हजार बाह्त स्वतः कडे ठेवून चालकाला 400 रुपये दिले आणि पळ काढला.
advertisement
घडलेल्या प्रकरणाची त्या कपलने टॅक्सीचा नोंदणी क्रमांक नोंदवून दुसऱ्या दिवशी सहारा पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. सहारा पोलिसांनी इम्तियाज अहमद आणि रियासत अली खान यांना अटक केली असून दोन्हीही टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचे परमिट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडे कारवाई सुरू केली आहे. या दोघांनी यापूर्वीही किती प्रवाशांना लुटलं आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 8:38 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: 18Km साठी 3000 भाडं? थायलंड रिटर्न कपलला गंडा घालणं कॅब ड्रायव्हरला महागात पडलं; विमानतळ पोलिसांकडून दोघांना अटक







